बस दरीत कोसळून ३६ प्रवासी ठार
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; मृतांचा आकडा वाढणार
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-05 11:50:23
नवी दिल्ली : उत्तराखंडमधील अल्मोडा येथे सोमवारी (दि. ४) सकाळी आठला प्रवासी बस दीडशे फूट दरीत कोसळली. या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. अल्मोडा येथील कुपीजवळ हा अपघात झाला. बसमध्ये ४२ प्रवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कुमाऊं विभागाचे आयुक्त दीपक रावत म्हणाले, की अपघातात ३६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. नदीच्या दहा फूट आधी झाडात अडकल्याने बस थांबली. दरीत कोसळताना बसला अनेक धक्के बसल्याने प्रवासी खिडक्यांबाहेर फेकले गेले. 28 जणांचा ऑन द स्पॉट मृत्यु झाला तर ८ जणांचा रुग्णालयात मृत्यु झाला. बस किनाथहून रामनगरकडे जात होती. दिवाळीच्या सुट्टीनंतर सोमवारी बस पूर्ण भरली होती. बहुतेक स्थानिक लोक बसमध्ये होते. दरम्यान, मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये व जखमींना प्रत्येकी एक लाखाची मदत जाहीर केली आहे.
आयुक्तांनी कुमाऊं विभागाला या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे निर्देश दिले. पौरी व अल्मोडा येथील एआरटीओंना निलंबित केले आहे. जखमींना रामनगर रुग्णालयात दाखल केले आहे. तेथून गंभीर जखमींना एअरलिफ्ट करून हल्द्वानी येथे हलविण्यात येणार आहे. काही जखमींना ऋषिकेश एम्समध्ये पाठविण्यात आले आहे. प्राथमिक तपासात बस खूपच जुनी असल्याचे समोर आले आहे.