टोळक्याच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
महिरावणी येथील घटना; संतप्त जमाव पोलीस ठाण्यावर
Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-11-06 12:02:35
लोकनामा प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर ः मागील भांडणाचा राग मनात धरून चौघांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. एकजण जखमी असल्याने त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. आणखी एकाच्या मागावर पोलीसपथक आहे. ही घटना सोमवारी (दि. ४) रात्री नाशिक- त्र्यंबकेश्वर रोडवरील महिरावणी बसथांब्याजवळ घडली.
त्र्यंबकेश्वर येथील यात्रेत पेगलवाडी व गणेशगाव या दोन गावांमधील तरुणांमध्ये हाणामारी झाली होती. यावरून अधूनमधून त्यांच्यात वाद सुरू होता. सोमवारी सायंकाळी साडेसात ते साडेआठदरम्यान अंकुश गोहिरे व पवन लहानू बदादे महिरावणी बसथांब्याजवळ आले असता, मनोज लिलके, अमोल नेमाडे, आकाश पारधी व विशाल गोकुळ ठमके यांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आकाश पारधीने चाकूने दोघांना भोसकले. यात अंकुश गोहिरे (वय २१, रा. गोहिरेवाडी, पेगलवाडी) मरण पावला. पवन बदादे जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाण करणारा एकजण दवाखान्यात आहे.
या घटनेनंतर सर्व संशयितांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी जमाव त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यासमोर जमला होता. मृताचे पार्थिवदेखील पोलीस ठाण्यासमोर ठेवले होते. पोलिसांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर जमाव परत गेला. पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे तपास करत आहेत.