जन्मदात्या आईनेच केला एक वर्षाच्या मुलाचा खून

पती व दिराचाही गुन्ह्यात सहभाग

Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-11-06 12:10:34

लोकनामा प्रतिनिधी
मालेगाव : शहरातील बदर का बाडा येथे जन्मदात्या आईनेच आपल्या एकवर्षीय मुलाचा खून केला. खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मारेकरी महिलेला तिच्या पती व दिराने मदत केल्याचे उघड झाले आहे. 
         मायलेकाच्या नात्याला काळिमा फासलेल्या या घटनेत बदर का बाडा येथील राहत्या घरात मोहम्मद साद अब्दुल माजिद या एकवर्षीय बालकाच्या गळ्यावर व उजव्या हातावर त्याच्या आईने धारदार शस्त्राने खोलवर जखमा करून त्यास जीवे ठार मारले. त्यानंतर महिला, तिचा पती अब्दुल माजिद अब्दुल गनी व दीर मुदस्सिर अब्दुल गनी (सर्व रा. बदर का बाडा) यांनी घटना लपविण्यासाठी त्या ठिकाणची साफसफाई करून पुरावे नष्ट केले. त्यानंतर त्यांनी नातेवाईक व शेजाऱ्यापाजाऱ्यांना बालक मोहम्मद साद झोक्यातून पडून मरण पावल्याचे सांगत त्याचा दफनविधी करून मृतदेहाची विल्हेवाट लावली.
          या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, आझादनगरचे पोलीस निरीक्षक वाय. आर. घोरपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी उपनिरीक्षक राजेंद्र कोळी यांनी संशयित आई, पती अब्दुल माजिद व दीर मुदस्सिर अशा तिघांविरुद्ध आझादनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी संशयित अब्दुल व मुदस्सिर यांना ताब्यात घेतले असून, पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करीत आहेत. दरम्यान, खूनाचे कारण अद्याप समोर आले नसले तरी पोलीस या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.