आणखी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
दामदुपटीचे आमिष, तीन संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-11-06 12:52:59
लोकनामा प्रतिनिधी
शिरवाडे वाकद : आर्थिक गुंतवणुकीतून दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून गुंतविलेले पैसे परत न मिळाल्याने आर्थिक फसवणूक झालेल्या आणखी एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पीडित युवक वाघचौरे याच्या पत्नीने लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सतीश पोपटराव काळे, योगेश काळे, शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. टाकळी, विंचूर), भोसले (पूर्ण नाव माहीत नाही, रा. भरवस फाटा, ता. निफाड)) यांनी स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रा. लि. लासलगाव ही पैसे दामदुप्पट करून देणारी कंपनी स्थापन केली. यातील फिर्यादीचे पती प्रतीक बाबासाहेब वाघचौरे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून फिर्यादीची सासू, सासरे, नणंद, मुलगी यांच्या नावाने सुमारे ५५ लाख रुपये गुंतवणूक करून घेतले. संबंधित रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. गुंतवणूकदारांचे गुंतविलेले पैसे परत न देता संबंधित कंपनीवर आर्थिक फसवणुकीबाबत गुन्हा दाखल असून, संबंधित कंपनी एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे फिर्यादीच्या पतीने मानसिक नैराश्यातून ३० ऑक्टोबरला रात्री ९.३० ते १० च्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे फिर्यादीचा पती प्रतीक वाघचौरे यांची आर्थिक फसवणूक करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
त्यामुळे काळे गँगच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.नीलेश पालवे यांनी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. जे. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ तपास करीत आहेत.