अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प
भारतीय वंशाच्या कमला हॅरीस पराभूत
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-06 15:24:45
वॉशिंग्टन: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला अमेरिकेत बहुमत मिळाले असून डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेत मतदानाला सुरुवात झाली. बुघवारी पहाटे मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी १ च्या सुमारास निकाल स्पष्ट झाले. अमेरिकेत भारतीय वंशाच्या कमला हॅरीस राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार होत्या. परंतु, त्यांचा पराभव झाला. अमेरिकेने सहा भारतीयांनाही स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणून संधी दिली आहे. स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह हे पद भारतातील आमदाराच्या समकक्ष असते.
दरम्यान, ओहियोमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य शेरॉड ब्राऊन यांचा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार बर्नी मोरेनो यांच्याकडून पराभव झाला. त्याआधी वेस्ट व्हर्जिनियाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जिम जस्टिस यांनी सहज विजय मिळवल्यानंतर या दोन जागांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. विस्कॉन्सिन, पेनसिल्वानिया आणि मिशिगन या ठिकाणी डेमोक्रॅटिक पक्षाकडून कडवी झुंज पाहायला मिळाली.
जिम जस्टिस यांच्या विजयामुळे डेमोक्रॅटिक पक्षाकडची वेस्ट व्हर्जिनियाची जागा रिपब्लिकन पक्षाकडे आली. त्याशिवाय टेक्सास आणि फ्लोरिडातील टेड क्रुझ व रिक स्कॉट या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे डेमोक्रॅट्सचे प्रयत्न धुळीला मिळाले.
हे यश आपल्या सगळ्यांना एकत्र आणणार आहे. आपल्याला सर्व समस्या सोडवायच्या आहेत. आपण सगळे मिळून अमेरिकेला पुन्हा महान बनवू शकतो. मी तुमचा अपेक्षाभंग करणार नाही. अमेरिकेचं भविष्य आणखी विशाल, आणखी चांगलं, आणखी श्रीमंत आणि आणखी सामर्थशाली असेल. ”, असे डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडात झालेल्या वेस्ट पाम बीच परिसरात आपल्या विजयी भाषणात म्हणाले. मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या भवितव्यासाठी मी प्रत्येक दिवशी लढत राहीन. जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे, तोपर्यंत मी लढत राहीन. समर्थ, सुरक्षित आणि वैभवशाली अमेरिका घडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हा अमेरिकेचा सुवर्णकाळ असणार आहे. असेही डोनाल्ड ट्रम्प यावेळी म्हणाले. दरम्यान, या भाषणात ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांचा ‘नवा तारा’ असा उल्लेख करत त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. “तुमच्या ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे मनापासून अभिनंदन. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळात चांगली कामगिरी केलीत. भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.