अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर होता महासागर!

खडकांचे विश्लेषण करत चिनी रोव्हरचा शोध

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-09 12:05:24

नवी दिल्ली : अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर एक महासागर असल्याचा शोध चिनी रोव्हरने लावला आहे. आजच्या कोरड्या आणि उजाड मंगळ ग्रहापेक्षा आधी खूप वेगळा असल्याचे पुरावे शास्त्रज्ञांना सापडले आहेत. रोव्हरने मंगळाच्या उत्तर गोलार्धात असलेल्या युटोपिया प्लॅनिशिया नावाच्या ठिकाणी असलेल्या पृष्ठभागावरील खडकांचे विश्लेषण केले. मंगळ ग्रहावरील प्राचीन समुद्राची माहिती देणारे अनेक भूवैज्ञानिक पुरावे या ठिकाणी सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.
            चिनी शास्त्रज्ञांनी सांगितले की, झुरोंग रोव्हरने मंगळाच्या उत्तर भागात उतरून २०२१ मध्ये आपल्या शोधमोहिमेला सुरुवात केली होती. चीनची तियानवेन-१ ऑर्बिटर, नासाचे मार्स रिकॉनिसेन्स ऑर्बिटर आणि झुरोंग यांसारख्या रोबोटिक उपकरणांनी गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळावर एकेकाळी महासागर अस्तित्वात होता. मंगळ ग्रहावरील वातावरण हळूहळू थंड झाले. कालांतराने येथील वातावरण कोरडे होऊन नष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ग्रहाच्या पृष्ठभागावर तयार झालेल्या रचना, जसे की, खळगे, पाण्याच्या वाहिन्या व ज्वालामुखीची निर्मिती, मंगळावर किनारपट्टी असल्याचे दर्शवतात. मंगळावर काही ठिकाणी उथळ, तर काही ठिकाणी खोल महासागर असल्याची चिन्हेदेखील आढळली आहेत.
        पृथ्वी आणि सूर्यमालेतील इतर ग्रहांप्रमाणेच मंगळाची निर्मिती सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली होती. ज्यावेळी या ग्रहावर महासागर होता. मात्र, या ग्रहाचे वातावरण हळूहळू बदलत कोरडे होत होते. मंगळावरील प्राचीन महासागरांच्या अस्तित्वाचा अनेक दशकांपासून अभ्यास केला जात आहे, तरीही अनेक प्रश्न कायम आहेत. या शोधांमुळे मंगळावरील सागरी सिद्धांताला बळकटी तर मिळतेच. शिवाय त्याच्या संभाव्य उत्क्रांतीवरही चर्चा सुरू झाली आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, मंगळावरील  प्राचीन महासागरामुळे या ठिकाणी सूक्ष्मजीवांची भरभराट झाली असावी.

चिनी अग्नी देवतेचे नाव झुरोंग रोव्हर

पौराणिक चिनी अग्नी देवतेचे नाव असलेले सौरऊर्जेवर चालणारे झुरोंग रोव्हर मे २०२१ मध्ये सहा वैज्ञानिक शोध उपकरणांसह मंगळावर उतरविण्यात आले होते. हे रोव्हर मे २०२२ मध्ये हायबर्नेशन मोडमध्ये गेले. तीन महिन्यांच्या नियोजित मोहिमेच्या वेळेपेक्षा अधिक वेळ शोधमोहीम राबविल्यावर ते निष्क्रिय झाले. 'नासा'च्या इनसाइट लँडरने मिळविलेल्या भूकंपीय डेटाचा वापर करून ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार, मंगळाच्या पृष्ठभागाखाली खडकांत मोठा जलाशय असू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.