पंत अथवा गिल होणार कसोटी कर्णधार?

रोहित शर्मा होणार पायउतार

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-11-09 13:05:41

मुंबई ः न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत लाजिरवाणा व्हाइटवॉश मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघावर कडाडून टीका झाली. कर्णधार रोहित शर्माला तर सर्वांत जास्त टीकेचा सामना करावा लागला. टी-२० विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद रोहितच्या नेतृत्वाखाली मिळाल्यानंतर रोहित सेनेकडून खूप अपेक्षा उंचावल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र रोहित सेना ही फक्त टी-२० फॉर्मेटमध्येच गुंग असल्याचे न्यूझीलंड मालिकेत समोर आले. तो लवकरच कर्णधारपदावरून पायउतार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील शेवटची कसोटी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मानहानिकारक पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा व रविचंद्रन आश्विन या ज्येष्ठ खेळाडूंपैकी किमान दोन खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका अंतिम ठरण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार कोण होणार, याची उत्सुकता क्रिकेटरसिकांत आहे.   कारण भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा उपकर्णधार सध्या  जसप्रीत बुमराह आहे. पण तो सर्वच कसोटी मालिका खेळेल असे नाही. त्याच्याकडे पुरेसा अनुभव नाही. त्यामुळे बुमराह कर्णधार होण्याची शक्यता फार धूसर आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मानंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी ऋषभ पंत आणि शुभमन गिलच्या नावाची चर्चा सुरू आहे.  ऑस्ट्रेलिया दौर्‍यानंतर बीसीसीआय याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.