महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर निकाल नाहीच
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-09 14:11:26
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि पक्ष व चिन्हप्रकरणी गेल्या अडीच वर्षांपासून तारीख पे तारीख पडत सुनावणी सुरू होती. मूळ प्रकरण घटनाक्रमापासून माहीत असूनही मावळते सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी कोणताही निर्णय न देता निवृत्ती स्वीकारली. ८ नोव्हेंबर २०२४ हा दिवस चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचा शेवटचा दिवस होता. त्यांना निरोप देण्यात आला. ते अधिकृतरीत्या १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होतील.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि पक्ष व चिन्ह प्रकरण ही सर्व प्रकरणे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी होती. मात्र, राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाही आणि वारंवार थेट टिप्पणी होऊनही कोणत्याही निर्णयाविना सरन्यायाधीश निवृत्त झाले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण नवीन सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुरू राहील. विशेष आमदार अपात्रता प्रकरणी प्रकरण विधानसभाध्यक्षांकडे सोपवताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अत्यंत कठोर टिप्पणी केली होती. त्यामुळे महाराष्ट्र सत्तासंघर्षाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाकडून देशाच्या राजकारणात मानदंड निश्चित केले जातील आणि चंद्रचूड यांच्याच कार्यकाळात महाराष्ट्र सत्तासंघर्षावर निकाल येईल, असे बोलले जात होते. सरन्यायाधीस चंद्रचूड १,२७४ खंडपीठांचा भाग होते. त्यांनी एकूण ६१२ निवाडे दिले. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सध्याच्या न्यायमूर्तींमध्ये सर्वाधिक निकाल लिहिले आहेत. शेवटच्या दिवशीही त्यांनी ४५ खटल्यांची सुनावणी केली. त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळातील प्रमुख निर्णयांत कलम ३७०, रामजन्मभूमी मंदिर, वन रँक-वन पेन्शन, मदरसा प्रकरण, शबरीमाला मंदिर वाद, निवडणूक रोख्यांची वैधता आणि सीएए-एनआरसी यांसारख्या निर्णयांचा समावेश आहे. दरम्यान, न्यायमूर्ती संजीव खन्ना सर्वोच्च न्यायालयाचे ५१ वे सरन्यायाधीश होतील. चंद्रचूड यांनी त्यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ सहा महिन्यांचा असेल. ते १३ मे २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत.