कसोटीत ११ फलंदाजांना बाद करणारे पराक्रमी गोलंदाज

Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-09 14:52:28

कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही संघांना दोनदा फलंदाजी करण्याची संधी मिळते. एका संघाचे प्रत्येकी ११ खेळाडू प्रत्यक्ष मैदानात फलंदाजी करू शकतात, पण त्यातील दहा फलंदाज बाद झाल्यावर फलंदाजी करणाऱ्या संघाचा डाव संपतो व एक खेळाडू नाबाद राहतो. या दहापैकी विरोधी संघातील गोलंदाज क्रिकेटच्या नियमानुसार फलंदाजांना बाद करतात. त्यांच्याच नोंदी संबंधित गोलंदाजांच्या नावे लागतात. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील केवळ मोजके सहाच गोलंदाज आहेत की, त्यांनी प्रतिपक्षाचे क्रमांक एक ते अकरापैकी दोन्ही डावांत मिळून किमान ११ गडी बाद केले आहेत. यात पाकिस्तानचे दोन, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. अशा या सहा हरहुन्नरी पराक्रमी गोलंदाजांविषयी प्रस्तुत लेखात जाणून घेऊया....       

       असा पराक्रम करणारा इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जिम लेकर क्रिकेट इतिहासातला पहिला गोलंदाज ठरला. सन १९५६ मध्ये मँचेस्टर कसोटी सामन्यादरम्यान लेकरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यांच्या सर्व अकरा फलंदाजांना बाद करण्यात यश मिळविले होते. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात लेकरने ९ फलंदाज कॉलिन मॅकडोनाल्ड, नील हार्वे, इयान क्रेग, कीथ मिलर, केन मॅककॉय, रॉन आर्चर, रिची बेनॉड, लेन मॅडॉक आणि इयान जॉन्सन यांना बाद केले, तर दुसऱ्या डावात जिम बर्क आणि रे लिंडवॉलसह सर्व दहा विकेट घेतल्या. या कसोटीत जिम लेकर एकूण १९ बळी घेण्यात यशस्वी ठरला. कसोटी डावात प्रतिस्पर्धी संघाचे १० बळी घेणारा जिम लेकर हा जागतिक क्रिकेटमधील पहिला गोलंदाज आहे.एस. वेंकटराघवन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या श्रीनिवास वेंकटराघवनने सन १९६५ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दिल्ली कसोटी सामन्यात एकूण १२ गडी बाद केले. एस. वेंकटराघवनने न्यूझीलंडचे सर्व अकरा फलंदाज बाद केले. ग्रॅहम डाउलिंग, टेरी जार्विस, रॉस मॉर्गन, बिवन काँगडॉन, बर्ट सटक्लिफ, विक पोलार्ड, जॉन बार्ड आणि फ्रँक कॅमेरॉन या आठ किवी फलंदाजांना पहिल्या डावात बाद केले. यानंतर दुसऱ्या डावात जॉन रीड, ब्रुस टेलर आणि रिचर्ड कॉलिंग या फलंदाजांना बाद केले.             

        ऑस्ट्रेलियाच्या ज्योफ डायमॉकने सन १९७९ मध्ये कानपूर कसोटीत भारताविरुद्ध बारा विकेट घेतल्या. त्या कसोटीत भारताच्या सर्व अकरा फलंदाजांना बाद करण्यात ज्योफला यश आले. ज्योफने पहिल्या डावात सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ, करसन घावरी, शिवलाल यादव आणि वेंकटराघवन यांना बाद केले होते. दुसऱ्या डावात चेतन चौहान, दिलीप वेंगसरकर, यशपाल शर्मा, कपिल देव, सय्यद किरमाणी आणि दिलीप दोषी यांना बाद करण्यात यश मिळवले होते. ज्योफने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सात  विकेट्स घेत एकूण १२ बळी घेतले.पाकिस्तानच्या अब्दुल कादिरनेही कसोटीत असा पराक्रम केला आहे. अब्दुल कादिरने सन १९८७ मध्ये लाहोर कसोटी सामन्यात इंग्लंडच्या सर्व ११ फलंदाजांना बाद केले होते. अब्दुलने या कसोटीत एकूण तेरा विकेट घेतल्या होत्या. इंग्लंडच्या पहिल्या डावात कादिरने ग्रॅहम गूच, ख्रिस ब्रॉड, टीम रॉबिन्सन, माइक गॅटिंग, बिल अथे, फिल डीफ्रेटास, जॉन अँबरी, नील फॉस्टर आणि निक कुक यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले, तर दुसऱ्या डावात ब्रूस फ्रेंच आणि डेव्हिड कॅपेल यांनाही बाद करण्यात आले. कादिरने दुसऱ्या डावात चार आणि पहिल्या डावात नऊ विकेट्स घेतल्या.           

         पाकिस्तानच्या वकार युनूसने सन १९९० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध फैसलाबाद कसोटीत सर्व ११ फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला होता. या कसोटीत वकारने एकूण १२ गडी बाद करण्यात यश मिळविले. वकारने पहिल्या डावात सात आणि दुसऱ्या डावात पाच फलंदाज बाद केले होते. यादरम्यान पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने किवी संघाच्या सर्व अकरा फलंदाजांना आपले बळी बनवले होते. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननेही ही कामगिरी केली आहे. मुरलीने सन २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गॉल कसोटीत हा पराक्रम केला होता. या कसोटीत मुथय्या मुरलीधरनने तेरा विकेट घेतल्या. त्यातील अकरा वेगवेगळे फलंदाज त्याच्या जाळ्यात अडकल्याने तोही या अनोख्या क्लबमध्ये सामील झाला. -डॉ. दत्ता विघावे   ( ९०९६३७२०८२ )