मॉस्कोवर युक्रेनचा ड्रोनच्या मदतीने हल्ला
तीन विमानतळे बंद ठेवण्याची वेळ
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-11 12:30:24
क्यीव : रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत युक्रेनने मॉक्सोवर सर्वांत मोठा हल्ला केला आहे. रविवारी युक्रेनने ३४ ड्रोनच्या मदतीने मॉक्सोवर हल्ला केला.
सन २०२२ मध्ये सुरू झालेल्या या युद्धात रशियाच्या राजधानीवर झालेला हा आतापय्ंतचा सर्वांत मोठा ड्रोन हल्ला असल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यानंतर रशियातील ३ मुख्य विमानतळांवरील वाहतूक अन्य ठिकाणी वळवण्यात आली आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून ३ तासांत राजधानीसह अन्य ठिकाणचे मिळून ३६ ड्रोन नष्ट केले. मॉस्को आणि त्याच्या परिसरातील भागात किमान २.१ कोटी लोकांची वस्ती आहे.
युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर रशियाकडून रात्री १४५ ड्रोनचे हल्ले झाले. हवाई सरंक्षण विभागाने त्यापैकी ६२ ड्रोन पाडून टाकले. काही अधिकाऱ्यांच्या मते युद्धाच्या सुरवातीच्या दिवसांनंतर आता रशियाचे सैन्य वेगाने पुढे जात आहे, तर अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध आता अंतिम टप्प्यात पोहोचेल. युक्रेनने फक्त मॉक्सोवर हल्ला केला नाही, तर शहराच्या पश्चिम भागात असलेल्या एका केमिकल कारखान्यावरदेखील ड्रोन हल्ले केले. यामुळे तेथे मोठा स्फोट झाला. हल्ल्यानंतर धुरामुळे तेथील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.