कॅनडातील खलिस्तानीसमर्थक शीख समुदायाचे नाही
कॅनडाच्या पंतप्रधानांची मोदींवरही टीका
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-11 12:47:25
नवी दिल्ली : कॅनडामध्ये खलिस्तानी कट्टरपंथी उपस्थित असून, त्यांच्याकडून भारताला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप भारताकडून अनेकदा करण्यात आला होता. मात्र, कॅनडाने हा दावा नेहमीच फेटाळून लावला. त्यानंतर आता पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या भूमीत खलिस्तान्यांचा वावर असल्याचे कबूल केले आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी आहेत, पण ते सर्व शीख समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तसेच कॅनडात पंतप्रधान मोदींचेही हिंदू समर्थक आहेत, पण ते सर्व हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असे विधान ट्रुडो यांनी केले आहे.
खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडात तणाव निर्माण झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रुडो यांचे विधान महत्त्वाचे मानले जाते. सप्टेंबर २०२३ मध्ये हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय गुप्तहेरांचा सहभाग असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता. त्यानंतर भारत आणि कॅनडामध्ये तणावाचे संबंध निर्माण होत गेले. भारताने निज्जरला दहशतवादी घोषित करून त्याच्या अटकेची मागणी केली होती. १८ जून २०२३ला ब्रिटिश कोलंबिया येथील एका गुरुद्वाराबाहेर निज्जरची हत्या करण्यात आली होती. मागच्या महिन्यात कॅनडाने निज्जरच्या हत्येची चौकशी करत असताना भारतीय उच्चायुक्तांवर ठपका ठेवला. उच्चायुक्तांना निज्जरच्या हत्येत रस होता, असा आरोप कॅनडाने केल्यामुळे भारताने नाराजी व्यक्त केली. तसेच आपले सर्व राजनैतिक अधिकारी कॅनडातून माघारी बोलविण्यात आले. तसेच कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांनाही देशाबाहेर काढण्यात आले. कॅनडाच्या सरकारने निज्जरच्या हत्येमध्ये भारताच्या सहभागाबद्दलचे पुरावे दिलेले नाहीत. ट्रुडो हे आगामी निवडणुकीसाठी मतपेटीचे राजकारण करत असल्याचाही त्यांच्यावर आरोप होत आहे. त्यामुळेच ते कॅनडाच्या भूमीवरील फुटीरतावादी घटकांचा सामना करण्यास अपयशी ठरत आहेत, अशीही टीका त्यांच्यावर होत आहे.