कुपोषित बालकांच्या संख्येत घट

सीईओ मित्तल यांच्या प्रयत्नांना यश, ११ ते २८ दरम्यान शोध मोहीम

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-11 14:13:04

लोकनामा प्रतिनिधी 
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांमुळे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर २०२४ या तीन महिन्यांत नाशिक जिल्ह्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील सॅम आणि मॅम कुपोषित बालकांच्या संख्येत घसरण झाली आहे. सीईओ आशिमा मित्तल यांच्या कल्पकतेने दीड वर्षापासून मुंबई आयआयटीमार्फत कुपोषणमुक्तीसाठी सुरू असलेल्या अविरत कार्याला यश मिळाले आहे. 
           सॅम अर्थात अतितीव्र कुपोषित आणि मॅम अर्थात मध्यम तीव्रतेच्या कुपोषित बालकांना त्यांच्या नैसर्गिक वाढीपर्यंत विकसित करून शारीरिक पोषण मिळावे, यासाठी जि.प. आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ ते २८ नोव्हेंबरदरम्यान शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. गेल्या शोध मोहिमेत आदिवासी आणि बिगर आदिवासी क्षेत्रात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सॅम बालकांची संख्या अनुक्रमे ५२८, ४४९, ३६९ आढळून आली. मात्र, योग्य उपचार पद्धतीमुळे जुलै महिन्यात असलेली सॅम बालकांची संख्या ५२८ वरून १५९ ने कमी होऊन ३६९ वर आली. मॅम बालकांची संख्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अनुक्रमे ३३८३, २८७३, २४०५ आढळून आली. 
मॅम बालकांवरील नियमित उपचारांमुळे जुलै महिन्यात आढळलेल्या ३,३८३ बालकांमधून ९७८ बालके मॅम श्रेणीतून बाहेर पडली आहेत. त्यामुळे सप्टेंबरमध्ये ही संख्या कमी होऊन २,४०५ वर आली आहे.
             आदिवासी, बिगर आदिवासी क्षेत्रांत ११ नोव्हेंबरपासून सॅम, मॅम बालकांच्या धडक शोध मोहिमेत अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. मोहिमेत सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे.
            मॅम बालके मध्यम तीव्र कुपोषित असल्याने त्यांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी त्यांना घरच्या घरी पूरक पोषण आहार दिला जातो. ज्यामध्ये प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश असतो. अंगणवाडीसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून बालकांच्या वजनाची नियमित तपासणी केली जाते. आवश्यक पोषक घटक त्यांना आहारामार्फत पुरविले जातात, जेणेकरून नियंत्रण मिळू शकेल. 

डॉक्टरांकडून होणार उपचार

सॅम बालके अतितीव्र कुपोषित असल्याने नैसर्गिक वय, वजन, उंचीच्या प्रमाणात अत्यंत कमी वजनाची असतात. त्यांना त्यांच्या नैसर्गिक वाढीपर्यंत पोहोचविण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात येते. पूरक पोषण आहार, औषधोपचार देऊन नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवून त्यांच्या वजनवाढीवर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे काही दिवसांत वजन वाढल्याने ही बालके सॅम श्रेणीतून मॅम श्रेणीत दाखल होतात.