स्वातंत्र्यानंतरची देशाची पहिली निवडणूक
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-11 14:26:17
भारत स्वतंत्र झाला आणि जगातील सर्वांत मोठी लोकशाही स्वीकारलेला एवढा मोठा देश ही निवडणूक कशा पद्धतीने पार पाडेल याकडे सारे जगाचे लक्ष लागले होते. सन १९४६ ला भारतीय राज्यघटनेची निवडणूक घेण्यात आली होती. इंग्रजांच्या अधिपत्याखालील अकरा प्रांतांतून २९२ सदस्य आणि केंद्रशासित राज्यातून ४ असे २९६ सदस्य निवडून आले, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ९३ असे एकूण ३८९ सदस्य निवडून आले. त्यात काँग्रेसचे २०४, मुस्लिम लीगचे ७३, अपक्ष १५, संस्थानांचे ९३ आणि केंद्रशासित ४ अशा निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ला बोलवण्यात आली होती. ही बैठक दिल्ली येथील संसद भवनात घेण्यात आली. त्यात हंगामी कार्यकारी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. काँग्रेसला बहुमत असल्या कारणाने डॉ. राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष, तर वीरेंद्र कुमार मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
त्याचवेळी मुस्लिम लीगने स्वतंत्र राज्यघटना आणि स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली आणि या समितीवर बहिष्कार टाकला. तो संदेश घेऊन इंग्रज राजवटीचा शेवटचे गव्हर्नर लॉर्ड माउंटबेटन इंग्लंडला गेले आणि इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमेंट एटली यांच्यासमोर त्यांनी हा संदेश वाचून दाखवला. तेथील मंत्रिमंडळापुढे हा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यात त्यांनी भारत आणि पाकिस्तानची फाळणी करून टाका असा निर्णय दिला आणि भारत आणि पाकिस्तानची फाळणी करून टाकली. १४ ऑगस्ट १९४७ ला पाकिस्तान स्वतंत्र झाला, तर १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पाकिस्तानातील प्रदेशांतून निवडून आलेले सदस्य हे पाकिस्तान घटना समितीचे सदस्य बनले. भारतीय प्रदेशातून निवडून आलेले सदस्य भारतीय घटना समितीचे सदस्य बनले. पुढे तेच लोकसभेचे सदस्य म्हणून काम करू लागले, असे भारतीय घटना समितीत एकूण २९९ सदस्य होते. त्यांच्या विविध समित्या नेमण्यात आल्या. विशेष घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली. प्रत्येक समितीने आपापले काम पूर्ण केले आणि घटना समितीची शेवटची बैठक २६ नोव्हेंबर १९४९ ला बोलावली. त्यादिवशी घटना समितीचे कामकाज पूर्ण झाले. २६ जानेवारी १९२९ या दिवशी भारतीय स्वातंत्र्यवीर भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करत होते. त्या दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारी १९५० ला पहिल्यांदा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले. तसेच स्वतंत्र भारताचे उपराष्ट्रपती म्हणून राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली. पुढे निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यात सुकुमार सेन निवडणूक आयोगाचे अध्यक्ष झाले.
पूर्वी ठराविक आणि विशिष्ट लोकांना मतदानाचा अधिकार होता. परंतु भारतीय लोकशाही अंगीकारल्यामुळे २१ वर्षांवरील सर्व व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला. तर काही महिलांनी मतदार यादीत आपले नाव सांगण्यास नकार दिला. जवळजवळ २८ लाख महिलांनी आपली नावे सांगितली नाहीत. त्यावेळी बरेच मतदार अशिक्षित असल्यामुळे उमेदवारांसमोर फोटो, त्याचे नाव व चिन्ह असे होते. बोगस मतदान होऊ नये म्हणून प्रत्येकाच्या बोटाला काळी शाही लावण्याची पद्धत आली. त्यावेळी निवडणूक प्रचाराचे माध्यम म्हणून बैलगाडी, घोडागाडी, सायकल, पोस्टर, पत्रक, गल्लोगल्ली-घरोघरी गाठीभेटी घेणे, चौकसभा घेणे असे होते. विशेष म्हणजे, कम्युनिस्ट पक्षाला रेडिओवरून प्रचार करायची संधी मिळाली. अशाप्रकारे त्यावेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका दोन्ही बरोबर घेण्यात आल्या. परंतु त्याकाळी भारतीयांना मतदान प्रक्रिया काय असते वा ते कशासाठी करायचे हे पूर्ण माहीत नव्हते. म्हणून मतदान कार्यालयात प्रत्येक पक्षाच्या नावाची पेटी, उमेदवाराचे चिन्ह, त्याचे नाव लावण्यात आले होते. यासर्व मतपेट्या गोदरेज कंपनीकडून बनवण्यात आल्या होत्या. त्या इतक्या मजबूत होत्या की, त्या पेट्यांबरोबर कोणी छेडछाड करू शकत नव्हते. ही निवडणूक ६८ टप्प्यांत घेण्यात आली.
लोकसभेसाठी ४८९ जागांसाठी १८७४ उमेदवार उभे होते. त्यापैकी ७७५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. त्यावेळी देशाची लोकसंख्या जवळजवळ ३६ कोटी होती. आणि १७ कोटी लोकांना मतदानाचा अधिकार होता. त्यातील ४५.७ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यासाठी एकूण खर्च दहा कोटी ४५ लाख रुपये आला होता. काँग्रेसने ३६४ जागा जिंकल्या, कम्युनिस्ट पक्षाने १६, समाजवादी पक्षाने १२, किसान मजूर पक्ष ९, तर भारतीय जनसंघाने ३ जागा जिंकल्या होत्या आणि अपक्ष ३७ होते.
महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन झाल्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रमुख पंडित जवाहरलाल नेहरू होते. विरोधी पक्षनेते म्हणून कम्युनिस्ट पक्ष पुढे आला. समाजवादी पक्षाचे राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण हे प्रमुख होते. किसान मजदूर हा आचार्य कृपलानी यांचा पक्ष होता. तत्कालीन भारतीय जनसंघाचे प्रमुख श्यामाप्रसाद मुखर्जी होते. निवडणूक चार महिने चालली. पहिल्यांदा मतदान हिमाचल प्रदेशमध्ये २५ ऑक्टोबर १९५१ला झाले. त्यात पहिले स्वतंत्र भारतात पहिले मतदान देणारे हिमाचल प्रदेशातील किन्नर येथील श्याम सरण नेगी पहिले मतदार ठरले. शेवटच्या टप्प्याचे मतदान सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात सन १९५२ च्या फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पार पडले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका बरोबरच असल्यामुळे दोन्ही मिळून जवळजवळ ४५०० जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील लोकसभेच्या ४८९ जागा होत्या, तर १४ राष्ट्रीय पक्षांनी आणि ४० स्थानिक पक्षांनी या निवडणुकीत भाग घेतला होता. काँग्रेस पक्षाला बहुमत असल्यामुळे भारताच्या पहिल्या पंतप्रधानपदी पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड करण्यात आली, तर मुंबई प्रांताची पहिली निवडणूक म्हणजे आत्ताचा महाराष्ट्र, मुंबई प्रांतात गुजरातचा काही भाग होता.
कच्छ सौराष्ट्रमधील अहमदाबाद, बडोदा, सुरत, कर्नाटकातील चिकोडी, रायबाग, बेळगाव, पोखरी, तिकीट, मेंगाळ, बागलकोट, धारवाड, हुबळी, दादरा, नगर- हवेली हा भाग होता. मुंबई प्रांताची पहिली निवडणूक झाली. त्यात २६८ जागा होत्या. २६० जागा खुल्या प्रवर्गासाठी होत्या, तर आठ जागा मागास प्रवर्गासाठी राखीव होत्या. या निवडणुकीत ५०.७८ टक्के मतदान झाले. काँग्रेसला बहुमत असल्यामुळे काँग्रेस पक्षाचे स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांताचे पहिले लोकनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून मोरारजी देसाई यांची निवड करण्यात आली. त्यांच्या मंत्रिमंडळात (स्व.) यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, बाळासाहेब देसाई यांसह महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला. पुढे मोरारजी देसाई केंद्रीय मंत्रिमंडळात गेले. १ मे १९६०ला मुंबई प्रांताचे विघटन होऊन मध्य प्रदेश, नागपूर, विदर्भ, हैदराबादमधील मराठवाडा हा भाग घेऊन स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड करण्यात आली. पण सन १९६२ मध्ये मराठी भाषिक महाराष्ट्रात मतदारसंघांची नव्याने निर्मिती करण्यात आली. त्यानंतर निवडणूक घेण्यात आली.
एकूण २६४ मतदारसंघ तयार करण्यात आले. त्यांपैकी २१५ काँग्रेस पक्षाने जिंकले. शेतकरी कामगार पक्ष १५, प्रजा समाजवादी पक्ष ९, भारतीय कम्युनिस्ट पक्ष ६, रिपब्लिकन पक्ष ३, समाजवादी पक्षाला १ आणि अपक्ष १५ सदस्य निवडून आले आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यावेळी ९ मार्च १९६२ ला उत्तर कराडमधून यशवंतराव चव्हाण प्रचंड मतांनी निवडून आले आणि ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब भारदे हे विधानसभेचे अध्यक्ष झाले. शेकापचे कृष्णराव धुळप १० वर्षे विरोधी पक्षनेते होते. आचार्य अत्रे दादरमधून निवडून आले होते.
विदर्भाचे सिंह म्हणून जांबुवंतराव धोटे, वसंतराव वानखेडे ज्यांच्या नावाने स्टेडियम आहे, ते वानखेडेदेखील निवडून आले होते. तसेच ५० वर्षे सतत निवडून येण्याचा विक्रम गणपतराव देशमुख यांच्या नावे आहे, तेही या निवडणूकीत निवडून आले होते. मारोतराव कन्नमवारांसारखी माणसे या सरकारमध्ये होते. पुढे यशवंतराव चव्हाण केंद्रीय मंत्रिमंडळात देशाचे संरक्षण मंत्री झाले आणि मारोतराव कन्नमवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल प्रकाश यांनी कामकाज पाहिले होते.
-वाळू नवले ( ९८५०४३८४७५ )