मणिपूरमध्ये ११ दहशतवादी ठार
सीआरपीएफच्या जवानांची मोहीम
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-12 11:45:00
मणिपूर : सीआरपीएफच्या जवानांनी जिरीबाम भागात ११ संशयित दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. कारवाईदरम्यान सुरक्षा दलाचे दोन जवानही गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी (दि. १०) दहशतवाद्यांनी काही दुकानांना आग लावली होती. तसेच काही घरांवर आणि सीआरपीएफ कॅम्पवरही हल्ले केले होते. यानंतर सीआरपीएफ जवानांकडून दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवण्यात आली.
सशस्त्र दहशतवाद्यांनी बोरोबेकरा उपविभागातील अनेक दुकाने पेटवून दिल्याने जिरीबाम परिसरात तणाव निर्माण झाला होता. जूनपासून या भागात सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. सोमवारी (दि. ११) दुपारी अडीचच्या सुमारास दहशतवाद्यांनी बोरोबेकरा पोलीस ठाण्यावर गोळीबार केला. यानंतर ते जाकुराडोर करोंग भागात गेले. त्या ठिकाणी त्यांनी आग लावली. यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला.
दरम्यान, या कारवाईदरम्यान काही नागरिक बेपत्ता असून, अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण केले की, जवानांच्या कारवाईमुळे नागरिक लपून बसले आहेत याची माहिती घेतली जात आहे. मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. राज्यातील परिस्थिती नियत्रंणात आणण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनादेखील काही दिवस तैनात करण्यात आले होते. त्यानंतर काही ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आता पुन्हा एकदा काही ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडत आहेत.