रोजगार, वेतनवाढीत बेंगळुरू आघाडीवर

मुंबईतील सरासरी वेतन २५,१००, तर पुण्यात २४,७०० रुपये

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-12 12:07:44

लोकनामा प्रतिनिधी 
नाशिक ः देशात बेंगळुरू आजही रोजगार संधी व वेतनवाढ देणारे भारतातील सर्वोच्च शहर म्हणून वर्चस्व गाजवत आहे. येथे मागील वर्षाच्या तुलनेत ९.३ टक्के वृद्धी निदर्शनास आली. बेंगळुरूमधील सरासरी मासिक वेतन २९ हजार ५०० रुपये आहे. ही बाब देशातील आघाडीचा स्टाफिंग समूह टीमलीझ सर्व्हिसेसच्या ‘जॉब्स अँड सॅलरीज प्राइमर रिपोर्ट’मधून निदर्शनास आली आहे.
       या अहवालात हंगामी व स्थायी नियुक्ती बाजारपेठांमधील एकीकृत वेतनाचे विश्लेषण करून निवडक शहरे आणि उद्योगांतील कल कसा आहे याबाबत माहिती संकलित करण्यात आली. बेंगळुरूपाठोपाठ चेन्नई, दिल्लीचा क्रमांक येतो. येथे अनुक्रमे ७.५ व ७.३ टक्के इतकी मजबूत पगारवाढ आहे. यातून या रोजगार बाजारपेठांचे स्पर्धात्मक स्वरूप दिसून येते. चेन्नईमधील सरासरी मासिक वेतन २४,५०० रुपये आहे. दिल्लीत ते २७,८०० रुपये आहे. मुंबई व अहमदाबाद येथेही स्थिर वेतनवाढ दिसली.
              मुंबईतील सरासरी वेतन २५,१०० रुपये, तर पुण्याचे सरासरी वेतन २४,७०० रुपये आहे. त्यांनी आपली स्पर्धात्मक वेतन पातळी सांभाळली आहे. या शहरांत वेतनवाढ ४ ते १० टक्के या श्रेणीत आहे. उद्योग आघाडीवर ८.४ टक्के वेतनवाढीसह सर्वश्रेष्ठ कामगिरी ‘रिटेल’ने केली आहे. हाच कल कन्झ्युमर ड्युरेबल्स (५.२ टक्के) आणि बँकिंग आणि इतर सेवांतही (५.१ टक्के) दिसतो. दुसरीकडे, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि फार्मा, बांधकाम, रियल इस्टेट यांसारख्या क्षेत्रांत सामान्य वृद्धी दिसली आहे, जी कुशल व्यावसायिकांसाठीची त्यांची स्थिर मागणी दाखवते. सर्वाधिक वेतन देणाऱ्या उद्योगांत टेलिकम्युनिकेशन्स (२९,२०० रुपये), उत्पादन, इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर (२८,२०० रुपये), हेल्थकेअर आणि फार्मा (२७,६०० रुपये) व बांधकाम,  रियल इस्टेट (२७ हजार रुपये) यांचा समावेश आहे. या अहवालात गेल्या पाच वर्षांत नियमित वेतनवाढ देणाऱ्या काही विशिष्ट नोकऱ्यांवरदेखील प्रकाश टाकण्यात आला आहे. एफएमसीजी उद्योगात सर्वाधिक वृद्धी दिसते, ज्यात ट्रेनी असोसिएट आणि पायलट ऑफिसर या नोकऱ्यांसाठी अनुक्रमे ९.५ टक्के आणि ८ टक्के इतका जोरदार सीएजीआर आहे. त्याच्या पाठोपाठ बँकिंग आणि इतर उद्योगांत एचआर एक्झिक्युटिव्हज् (७.९ टक्के सीएजीआर) आणि सेल्स मॅनेजर (६.६ टक्के सीएजीआर) यांना लक्षणीय दीर्घकालीन वृद्धी मिळालेली दिसते.  शहरांचा विचार केल्यास हैदराबाद येथे ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (८.१ टक्के सीएजीआर), अहमदाबादमध्ये बॅंक ऑफिस एक्झिक्युटिव्हज् (७.८ टक्के सीएजीआर), पुण्यात सेल्स मॅनेजर (६.८ टक्के सीएजीआर) व दिल्लीत डाटा को-ऑर्डिनेटर (६.६ टक्के सीएजीआर) या विशिष्ट रोल्समध्ये चांगली वृद्धी दिसते. त्यातून उद्योग व शहरांत कुशल व्यावसायिकांची व्यापक मागणी आहे. स्थायी, हंगामी रोल्ससाठी मिळणाऱ्या वेतनात समानता दिसते. खास करून कन्झ्युमर ड्युरेबल्स, बांधकाम व रियल इस्टेट आणि अॅग्रिकल्चर व अॅग्रोकेमिकल्स यांसारख्या क्षेत्रात. या क्षेत्रांत वेतनातील फरक कमी आहे. कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये हा फरक फक्त ६.३ टक्के आहे. बांधकाम व रियल इस्टेटमध्ये ७.८ टक्के आणि अॅग्रिकल्चर, अॅग्रोकेमिकल्समध्ये ७.९ टक्के, तसेच रिटेलमध्ये ८.१ टक्के आहे.