मला समजलेला देव, धर्म अन् आत्मसाक्षात्कार !
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-12 18:57:02
प्रत्येकाची देवाबद्दलचे प्रेम, भक्ती आणि त्याबद्दलची कल्पना ही संपूर्णत: वैयक्तिक असते. तसेच धर्म म्हणजे काय हेदेखील प्रत्येकाने ठरवून घेतलेले असते. हे सगळे समजून स्वतःबद्दलचा झालेला समज आणि करून घेतलेली कल्पना हीदेखील अगदी वैयक्तिक असते. या तीनही गोष्टींबद्दल अभिमान असतो आणि तो अगदी योग्य आहे. असाच मला झालेला समज, झालेले ज्ञान आणि साक्षात्कार मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. इथे कुणालाही दुखावण्याचा प्रयत्न नाही, पण प्रत्येक समज आपण डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करतो, तर आपल्या या वर्षानुवर्षे चालत आलेल्या समजांना जवळून निरखून का बघायचे नाही? बघू या...पण थोडेसे मागे जाऊन...
मानव उत्पत्ती : मानवाच्या उत्पत्तीविषयी बरेच गूढ असले, तरीही एका थिअरीबद्दल दुमत नाही. या पृथ्वीतलावर ज्या वेळेस एका रासायनिक प्रक्रियेच्या संयोगाने दोन पेशी एकत्र आल्या आणि त्या संयोगात एक ऊर्जा-कण शिरून त्यात जीव निर्माण झाला, त्यावेळेस पृथ्वीतलावर पहिला जीव जन्मास आला. हाच ऊर्जा-कण सगळ्या जीवन- मृत्यूच्या खेळास कारणीभूत असतो. त्या ऊर्जा-कणाचा कधीच नाश होत नाही, पण त्याच्या अस्तित्वाने एखाद्या जिवाश्माचा जन्म किंवा नसण्याने मृत्यू निश्चित होतो. हाच तो ऊर्जा-कण म्हणजे माझ्या मते दुसरा, तिसरा कोणीही नसून जनमानसांत रूढ असा आत्मा होय! नवीन जन्मास आलेल्या सगळ्या प्राण्यांना प्रामुख्याने दोन कर्मे होती, जी त्यांना आपल्या जीवनात पूर्ण करायची होती. ती दोन कर्मे म्हणजे प्रजनन आणि उदरभरण, कदाचित प्रजननासाठी उदरभरण ! हे उदरभरण करीत असताना ते एकमेकांचे भक्ष्य होत होते. तेव्हा स्वत:चे संरक्षण करणे म्हणजेच आपल्या प्रजोत्पादनाचे संरक्षण, हादेखील एक अविभाज्य भाग झाला. त्यामुळे आता तिसरे कर्म अंगाशी आले, ते म्हणजे स्वसंरक्षण. प्रजनन, उदरभरण आणि स्व:संरक्षण अशी तीन कर्मे प्रामुख्याने या प्राणिमात्रांचा आता धर्म झाला!
हजारो वर्षे गेली आणि प्राण्यांमध्ये एक प्राणी, वानर उदयास आले. हे वानर कालांतराने विचार करू लागले. हा उत्क्रांतीचा सगळ्यात मोठा टप्पा होता. पुढे त्याला निवाऱ्याचा शोध लागला, वस्त्रांचा शोध लागला, हत्यारांचा शोध लागला. वानराचे हळूहळू मनुष्यात रूपांतर होऊ लागले. त्याला जास्त निवांत वेळ मिळू लागला. प्रजोत्पादन आणि उदरभरण यांत कमालीची वाढ झाली. मनुष्य नावाचा प्राणी उदयास आला! कालांतराने मनुष्याला अग्निचा शोध लागला, तेव्हा यावर लक्ष केंद्रित करून त्याने अन्नाचा प्रश्न काही अंशी सोपा करून घेतला. हजारो वर्षांनी शेतीचा शोध लागला हे वेगळे, या प्राण्यांच्या शिकारीला आणि शेतीला त्याला इतर मित्रांची गरज भासू लागली. माणसाला माणसाची प्रथम गरज भासू लागली. अग्निवर कब्जा करण्याचा शोध. अग्नी हवा तेव्हा पेटवणे आणि विझवणे, हादेखील एक महत्त्वाचा शोध त्याला लागला होता. या शोधामुळे त्याच्या राहणीमानात आमूलाग्र बदल घडून आला. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनही शोधांमुळे आता उदरभरण, प्रजनन आणि स्वसंरक्षण यांतदेखील प्रचंड फरक पडला होता. माणसाचे तीनही धर्म काही प्रमाणात बदलले होते.
शेकडो वर्षे गेली. प्रेम, आस्था, सद््भावना, काळजी ही काही नवी स्पंदने माणसाला जाणवू लागली. मनुष्य वस्ती करून राहू लागला. टोळ्यांनी राहू लागला. एकमेकांची गरज भासू लागली, जेणेकरून राहणीमान सुकर झाले होते. अन्न, वस्त्र, निवारा वाटून घेऊ लागला. एकमेकांबद्दल जबाबदरीची एक नवीनच भावना मनात तयार होऊ लागली. हा माणसाच्या उत्क्रांतीतील दुसरा नवीन टप्पा होता. आपल्याला पुरून उरलेली वस्तू वाटून घेणे, एकमेकांची काळजी, लहान मुलांचे संगोपन, मोठ्यांचा आदर, आजाऱ्याची देखभाल, एकमेकांस अडचणीत मदत, आपले कुटुंब सोडून इतर कुटुंबांबरोबर सहजीवन असे छोटे छोटे बदल संस्कार म्हणून राबवले जाऊ लागले. याला अनेक वर्षे लागली असतील, पण हे थोडेथोडके नव्हते. हे ‘संस्कार’ मनुष्याच्या पुढील सुखी आणि सुरक्षित आयुष्यासाठी पूरक आहेत, हेच त्याला लक्षात आले.
हा कळप आता नुसताच कळप नसून हळूहळू ठराविक समहेतू, समउद्देशी, समविचारी, समआहारी, समभाषी अशा लोकांचा एक समाज बनला होता. या नवीन समाजाला आता काही कायद्याची बंधने आली. त्याच समाजाला आता संस्कृती नावाची एक संहिता मिळाली होती. आणि ही संस्कृती अंगीकारलेल्या समाजात राहाणाऱ्या मनुष्याचे मानवात रूपांतर झाले! हे आपण पुढील अंकी पाहूच. (क्रमशः)
-निखिल राजे ( ९०२८४९९९२१ )