श्वसनासंबंधी रोग अन् त्यापासून बचावाचे उपाय
जागतिक न्यूमोनिया दिन
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-12 18:59:51
जागतिक न्यूमोनिया दिनानिमित्त आज माहिती घेऊया. एका गंभीर आजारावर, जो विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो तो म्हणजे न्यूमोनिया! न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्गजन्य आजार असून, तो जिवाणू, विषाणू किंवा बुरशीमुळे होऊ शकतो. या आजारामुळे दरवर्षी लाखो लोकांना त्रास सहन करावा लागतो. योग्य काळजी आणि उपाय न केल्यास आपत्कालीन गंभीर परिस्थिती उद्भवू शकते आणि योग्य काळजी घेतल्यास हा आजार टाळता येतो.
न्यूमोनिया म्हणजे काय?
न्यूमोनिया हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये फुफ्फुसातील हवेचे कोष जंतुसंसर्ग होऊन इन्फेक्शन होऊन द्रव किंवा पूने भरले जातात. यामुळे खोकला, ताप, थंडी, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसू लागतात. न्यूमोनिया सौम्य ते गंभीर असा असू शकतो, ज्यामुळे काही प्रकरणांमध्ये रुग्णालयात दाखल करणे आवश्यक ठरते.
कारणे अन् धोके
न्यूमोनिया विविध प्रकारच्या सूक्ष्मजंतूंमुळे व जंतूसंसर्गामुळे होऊ शकतो, जसे की- जिवाणू (उदा. Streptococcus pneumoniae) टीबी (Tuberculosis ) * विषाणू (उदा. फ्लू विषाणू, कोविड-१९) बुरशी (मुख्यतः प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये आढळते)
धोक्याचे घटक म्हणजे धूम्रपान, श्वसनाचा रोग, मधुमेह, अस्थमा (दमा) कमी प्रतिकारशक्ती, लहान वय किंवा वृद्धावस्था.
लक्षणे ओळखणे महत्त्वाचे : न्यूमोनियाची लक्षणे ओळखणे लवकर निदानासाठी महत्त्वाचे आहे. यामध्ये मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत- सातत्याने खोकला आणि कफ, ताप, थंडी व घाम येणे, श्वास घेताना त्रास किंवा श्वास घ्यायला अडचण, छातीमध्ये वेदना, विशेषतः खोल श्वास घेताना थकवा आणि अशक्तपणा.
न्यूमोनिया अन् फ्लू लसीकरण : प्रतिबंधनात्मक उपाय
न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी चांगली स्वच्छता, निरोगी जीवनशैली आणि योग्य लसीकरण करणे आवश्यक आहे. लहान मुले, वृद्ध लोक आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी न्यूमोनिया व फ्लूच्या लशी अत्यावश्यक आहेत. नियमित हात धुणे, धूम्रपान टाळणे, चेहऱ्यावर मास्क आणि दीर्घकालीन आजारांवर नियंत्रण ठेवणे या सवयींमुळे न्यूमोनियाचा धोका कमी होतो.
लवकर निदान अन् उपचाराचे महत्त्व : लवकर निदान आणि योग्य उपचार हे न्यूमोनियाचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक आहेत. वेळेत उपचार न घेतल्यास न्यूमोनिया गंभीर स्थितीत जाऊ शकतो. म्हणूनच न्यूमोनियाची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या जागतिक न्यूमोनिया दिनाच्या निमित्ताने आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा संकल्प करूया आणि फुफ्फुसांची काळजी घेऊया.
-डॉ. स्वप्नील काकड, श्वसनविकारतज्ज्ञ, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक