टी-२० मध्येही भारताचा विजयी सुकाळ संपला
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-11-12 19:03:58
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा तीन गडी राखून पराभव करत मागील पराभवाचा बदला घेतला. याआधी भारताने पहिल्या टी-२० सामन्यात यजमानांचा ६१ धावांनी पराभव केला होता. रविवारी या विजयासह आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. गकेबरहा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ट्रिस्टन स्टब्सच्या नाबाद ४७ धावांच्या स्फोटक खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने १९ षटकांत सात गडी गमावून १२८ धावा केल्या आणि सामना जिंकला. भारताचे लक्ष आता १३ नोव्हेंबरला सेंच्युरियनमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यावर असेल. हा सामना जिंकणारा संघ मालिका विजेता ठरेल. या पराभवासह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताची विजयी मालिका संपुष्टात आली आहे.
टी-२० वर्ल्डकप २०२४ नंतर टीम इंडियाने झिम्बाब्वेला भेट दिली. या दौऱ्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत शुभमन गिलच्या संघाने ४-१ असा विजय मिळविला होता. यानंतर टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यावर ३-० असा विजय मिळविला, तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने घरच्या मालिकेतही बांगलादेशचा ३-० असा धुव्वा उडविला. मे-जूनपासून सुरू असलेली टीम इंडियाची विजयी घोडदौड अखेर थांबली. या कालावधीत भारताने एकूण ११ सामने जिंकले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वरुण चक्रवर्तीने प्रभावित केले. आपल्या घातक गोलंदाजीने त्याने यजमान संघाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये धाडला. या मिस्ट्री फिरकीपटूने चार षटकांच्या आपल्या कोट्यात ४.२५ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आणि पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा पहिला पाच बळींचा कारनामा आहे. या स्पेलमध्ये त्याने केवळ १७ धावा केल्या. मात्र, स्टब्सने त्याचे प्रयत्न हाणून पाडले आणि पंधराव्या षटकापासून सामना दक्षिण आफ्रिकेकडे वळवला.
डावाची एका बाजूने पडझड होत असताना ट्रिस्टन स्टब्सने शानदार खेळी करत दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि ८६ धावांत त्यांनी सात गडी गमावले होते. वरुण चक्रवर्तीच्या भेदक फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारत हा सामना जिंकण्यात यशस्वी होईल असे वाटत होते, पण शेवटी स्टब्सने आक्रमक खेळ करत संघाला विजयापर्यंत नेले. त्याने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला लक्ष्य करत संघाला कठीण परिस्थितीतून सोडवले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या भारताने दुसऱ्या टी- २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर १२५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताला सुरुवातीचे धक्के दिले आणि भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. भारताकडून अष्टपैलू हार्दिक पंड्याने ४५ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने सर्वाधिक नाबाद ३९ धावा केल्या. हार्दिकव्यतिरिक्त अक्षर पटेलने २१ चेंडूंत २७ आणि तिलक वर्माने २० चेंडूंत २० धावा केल्या. पॉवर प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत भारताला सुरुवातीलाच तीन धक्के दिले. हार्दिकच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर लढाऊ धावसंख्या गाठण्यात यश आले.
मागील तीन वर्षांत जागतिक क्रिकेटवर एक कलमी वर्चस्व निर्माण करणाऱ्या टीम इंडियाचा हुकूमतीला श्रीलंकेत वन-डे मालिकेत पराभवाने झटका बसला. त्यानंतर कसोटी मालिकेत डब्ल्यूटीसी चक्रात न्यूझीलंडविरुद्ध अक्षरशः धोबीपछाड मिळाला आणि राहता राहिलेल्या टी- २० प्रकारातही विजयाची अखंडित मालिका भंगली. अशा रीतीने भारताचा क्रिकेटच्या तीनही प्रारूपातील विजयी सुकाळ संपला आहे.
- डॉ. दत्ता विघावे ( ९०९६३७२०८२ )