'मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे'
मोदींच्या सभेत घोषणाबाजी
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-11-13 12:53:02
पुणे : शहरातील एस.पी. महाविद्यालय मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असताना, एका मराठा बांधवाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ घातला. मोदी यांचे भाषण सुरू असताना व्हीव्हीआयपी रांगेतच काही प्रमाणत हा गोंधळ झाला. एक मराठा कार्यकर्ता उठला आणि 'एक मराठा लाख मराठा' घोषणा देत त्याने सर्वांचे लक्ष वेधले.
पतंप्रधान मोदींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मंगळवारी (दि. १२) दुसरा दौरा होता. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात पहिली सभा घेतल्यानंतर त्यांनी सोलापुरातील सभेतूनही काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यानंतर पुण्यात महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करत कलम ३७० वरून काँग्रेसवर निशाणा साधला. या सभेत एका मराठा बांधवाने घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष वेधले. 'मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे' म्हणत हा कार्यकर्ता आक्रमक झाल्याने पोलिसांची व सुरक्षारक्षकांची धांदल उडाली. पंतप्रधानांचे भाषण सुरू असताना पोलिसांनी त्या व्यक्तीला आवरले व त्याला खाली बसायची विनंती केली. मात्र, तो आक्रमक होत पुन्हा मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करू लागला. त्यामुळे अखेर पोलीस अधिकारी व भाजप कार्यकर्त्यांनी येऊन संबंधित व्यक्तीला शांत केले. सभास्थळावरून दूर नेले. पंतप्रधानांनी पुण्यातील उमेदवारांसाठी सभा घेतली, तर गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत सभा घेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. शहा यांची मुंबईतील दुसरी सभा बोरिवलीत झाली. उत्तर मुंबईतील सहा उमेदवारांसाठी ही सभा घेतली होती.