उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करा

केजरीवालांच्या ‘आप’कडून मोठी मागणी

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-11-13 13:05:06

मुंबई : हरियाणातील विधानसभा निवडणुकीत जो प्रकार घडला, त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात टाळायची असेल, तर महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली आहे. महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना आत्ताच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

        संजय सिंह म्हणाले की, जर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नंतर जाहीर केला, तर एकमेकांचे आमदार महाविकास आघाडीत फूट पाडू शकतात. हरियाणामध्ये हेच झाले, काँग्रेसचे गट एकमेकांना पाडायला निघाले, त्यात काँग्रेसचे नुकसान झाले. त्यामुळे माझे म्हणणे आहे, नंबरवाल्या खेळामध्ये तुम्ही फसू नका. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये जबरदस्त काम  केले आहे. मराठी माणूस, मराठी स्वाभिमान या गोष्टीसुद्धा त्यांच्यासोबत जोडल्या जातात. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवले तर महाविकास आघाडीचा फायदा होईल, हे माझे वैयक्तिक मत आहे. भाजपला आम्ही हरवायचे ठरवले आहे. आम्हाला महाविकास आघाडीमध्ये जागा देत होते, पण तरी आम्ही घेतली नाही, असेही संजय सिंह यांनी सांगितले.
        मला वाटत नाही राज ठाकरे भाजपचे समर्थन करायला जात आहेत, ते वेगवेगळा स्टॅंड घेतात. थोडी काही मते मनसे फोडू शकते, शिंदे गट फोडू शकतो, पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना चेहरा केले तर ही मतांची फोडाफोडीसुद्धा कमी होऊ शकते. भाजपने महाराष्ट्रासोबत सावत्र आईसारखा व्यवहार केला. अनेक योजना, प्रकल्प पंतप्रधान आपल्या गृहराज्यात घेऊन गेले. आतापर्यंत आपण बाइकचोर व इतर चोर पाहिले, पण भाजपने तर पक्षच चोरला. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना सोबत घेतले.
         तुम्ही म्हणता एक है तो सेफ है. तुम्ही हिंदूंना घाबरवत आहात. पंतप्रधानांना अशी भाषा शोभा देते का? तुम्ही जर हिंदूंना सुरक्षित ठेवत नसाल तर तुम्ही राजीनामा द्या. बटेंगे तो कटेंगे हा काय नारा आहे? अगर बटेंगे तो संविधान खतरे में आ जायेगा, आरक्षण खत्म हो जाएगा... ना बटिये ना कटिये मिलके बीजेपी को रपटिये, अशी टिप्पणी संजय सिंह यांनी केली.