झोपेची एक वेगळी गंमत

Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-13 14:35:35

आपण वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्तींच्या, विचारांच्या, आवडीच्या प्रभावाखाली असतो. अर्थात त्याला कारण म्हणजे त्या बाबी आपल्याला संपूर्णपणे पटलेल्या असतात. सध्या मला विचाराल, ‘हाल कैसा है जनाब का?’ तर खरोखरच सध्या माझी स्टेज म्हणजे ना पूर्णपणे आजारी आणि नाही नेहमीसारखी ठणठणीत. अर्थात जी काही थोडीफार कुरबूर आहे ती शरीराचीच आहे. मनाच्या बाबतीत बोलायचे, तर ‘ऑल इज वेल’. जोक अपार्ट, पण ही स्टेज मोठी कठीण. पूर्णपणे बरे नसलं की माणूस चूपचाप, गपगुमान झोपून तरी राहतो, पण या माझ्यासारख्या अर्धवटरावाच्या अवस्थेत ना धड पूर्णपणे नेहमीसारखे फूल स्विंगने कामे करवत, नाही निव्वळ झोपून राहावत. सुट्टीच्या दिवशी आरामाचा प्रयोग करायच ठरविले आणि कसले काय पूर्णपणे आजारी नसल्याने सुट्टीच्या दिवशी घरात नुसती उचकापाचक करीत राहिले.
         तरीही एका उपायाने माझा आजार पूर्णपणे पळाला. मी जवळपास आठ दिवस मोबाईलचा वापर अत्यंत कमी करून रात्री जास्तीत जास्त शांत झोप याने की साउंड स्लीप घेतली. मी मोबाईलचा वापर फक्त माझी पोस्ट टाकणे आणि अत्यावश्यक फोन करणे व घेणे इतकाच ठेवला, सोशल मीडियापासून जरा दूर झाले. अर्थात, बरं वाटल्यावर आता परत सुरू होईलच, येरे माझ्या मागल्या... मोबाईलचा वापर ही माझी जित्याची खोड खरी, जीवनात अत्यावश्यक असणाऱ्या या तंदुरुस्त, निरामय जीवनासाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे झोप! यानी की निद्रा. ही जर व्यवस्थित मात्रेत आपण घेतली तरच आपले आरोग्य हे तंदुरुस्त राहाते. माणसाच्या आयुष्यात सुखाचे स्थान हे खूप वरच्या लेव्हलवर असतं आणि हा सुखाचा परमोच्च बिंदू गाठता आला तरच सुखाची शांत झोप लागते असेही आपण म्हणतो. माणसाच्या आयुष्यात अगदी आपली जन्माच्या सुरवातीची काही मिनिटे खूप महत्त्वाची, शांतीची. कारण ही काही मिनिटे आपण आईच्या गर्भातून अलगद एका शांत सुखकारक झोपेत असतो. मग एकदा का ही काही मिनिटे गेली की, डॉक्टर आपल्याला चापट्या मारून मारून उठवतात, टँह्या, टँह्या रडायला भाग पाडून सुखाच्या झोपेतून उठवून या संसारातील टक्केटोणपे खायला सज्ज करतात. झोपेचीही गंमतच असते बघा, ही निरनिराळ्या टप्प्यावर निरनिराळ्या वेळी, निरनिराळा आनंद देत असते. पहाटेची झोप बहुतेकांनाच खूप हवीहवीशी वाटते. तिलाच आपण साखरझोप असेही म्हणतो. मात्र बीपी, शुगरचे ससेमिरे मागे लागले की, ही साखरझोपच आपल्या आरोग्याचा शत्रू होते. मग बळबळंच का होईना प्रभातफेरीला बाहेर पडावे लागते. सगळ्यात कठीण क्षण कोणता, तर ते ब्लँकेटमधून बाहेर पडणे.
          दुसरी झोप म्हणजे दुपारची वामकुक्षी. ही झोप सुट्टीचा दिवस सोडला, तर नोकरदार वर्गाच्या नशिबी नसते. तिसरा झोपेचा टप्पा म्हणजे रात्रीची झोप. रात्री लवकर झोपणं हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम, परंतु संपूर्ण दिवस आपला आखीवरेखीव रूटीन कामांमध्ये गेल्यावर, आपल्याला आपल्या स्वतःसाठी जो खास क्वालिटीटाइम मिळतो तो रात्रीचाच असतो. अशावेळी आपण झोप बाजूला सारून वाचन, लिखाण अशी आपली आवडती कामे करू शकतो. विद्यार्थ्यांना तर प्रसंगी रात्रीचा दिवस करून मान मोडून अभ्यास करावा लागतो. या झोपेचे अनन्यसाधारण महत्त्व ज्यांना नैसर्गिक चटकन झोप लागते त्यांच्यापेक्षा ज्यांना झोपेची मनधरणी, आराधना वा झोपेच्या गोळ्यांची मदत घ्यावी लागते त्यांना विचारा. या झोपेचं नं गणितच अजब असतं बघा. काही वेळेस खूप ताण-तणावाने अथवा दुःखाने झोप लागत नाही, तर कधी खूप आनंदाने, सुखाने, अतीव समाधानानेपण झोप लागत नाही. ही झोप कधी कधी अगदी रस्त्याच्या कडेला उघड्यावर झोपणाऱ्यांनापण नशिबी असते, तर कधी कधी महालात राहून गाद्यागिरद्यांवर लोळणाऱ्या श्रीमंत व्यक्तींसाठी ही दुरापास्त असते. चांगल्या समाधान देणाऱ्या झोपेसाठी शारीरिक कष्ट आवश्यक व मानसिक क्लेश व्यर्ज, अशी अवस्था असावी लागते. या बाबतीत मी खरंच खूप नशीबवान आहे. मला भरपूर कामे असताना निद्रादेवी बिचारी शांतपणे माझी कामे आटोपायची वाट बघते, तर ज्यावेळी कामं आटोपून मला झोप घ्यावीशी वाटते, तेव्हा हुकूमसरशी ती दोन मिनिटांत माझ्या डोळ्यांवर आरूढ होऊन मला शांत समाधान देणाऱ्या झोपेचा लाभ करून देते. आजच्या लिखाणाची सांगता माझ्याच एका आवडणाऱ्या रचनेने करते.
तार छेडीताच जणू 
सप्तसुरांची उधळण व्हावी,
स्वप्नकळ्यांची फुले होऊनी 
अलगदरीत्या ओंजळीत पडावीत ।।
प्रभातसमयी हरिनामाची 
धून हलकेच कानी पडावी,
पक्ष्यांच्या कलरवाने त्याला 
मंजुळ, मधुर साथ द्यावी।।
भुकेल्या क्षणी भोजन मिळावे, 
अशी अन्नपूर्णेची कृपा घडावी,
निरामय आरोग्य लाभेल मजला 
अशी धन्वंतरीची साथ मिळावी ।।
नशिबी सदा कष्ट असावेत, 
त्या कष्टाचेच मोल कळावे,
द्रव्याचा अपव्यय होताच 
पैशात मजला माझे कष्ट दिसावे ।।
पाठ टेकीताच डोळे मिटावे, 
अशी निद्रादेवीची कृपा असावी,
शांत सुखाच्या झोपेनंतर 
अलगद हलकेच 
पहाट फुलावी, अलगद 
हलकेच पहाट फुलावी ।।

-कल्याणी बापट (केळकर) ९६०४९४७२५६