देव, धर्म अन्‌ आत्मसाक्षात्कार

Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-13 14:49:16

आपण पाहिले समहेतू, समउद्देशी, समविचारी, समआहारी, समभाषी अशा लोकांचा एक समाज बनला होता. लहान मुलांचे संगोपन, संरक्षण आणि काळजी हे मातांचे प्रमुख ध्येय बनले होते. त्यातूनच प्रेम, वात्सल्य या भावना पुढे जास्त कालावधीसाठी राहू लागल्या. 
           जसे लहानांचे संगोपन आणि देखभाल होत होती तसेच आता वय वाढत चाललेल्या बुजुर्ग मंडळींची देखभाल उदयास आली होती. त्यांनी कळपासाठी केलेले उपदेश, त्यातून झालेला फायदा याच्या पोटी उपकाराची भावना वाढीस लागली. उपकार हे वैयक्तिक नव्हते, तर त्या कळपाच्या वतीने जाहीर होण्यास सुरुवात झाली होती. त्यांच्या योगदानाबद्दल कळपाद्वारे त्यांचे उपकार मानले जाऊ लागले. ही उदयास आलेली खूप मोठी भावना होती. ही छोटीशी दिसणारी भावना मानवाच्या उत्क्रांतीत एक आमूलाग्र बदल घडवून आणत होती. 
         वयस्करांच्या राहणीमानात फरक पडत होता. हा त्यांच्याप्रति दाखवायच्या आभाराचीच एक भावना होती. तसेच अन्न, कपडे आणि निवारा पुरवणारे पुरुष यांच्याबद्दल आदर आणि उपकाराची भावना वाटणे घरी राहणाऱ्यांना स्वाभाविक होते. ही उपकाराची भावना व्यक्त केल्याने ही पुरवणारी मंडळी आनंदित होत असे आणि कधी तरी जास्त कौतुक करणाऱ्या व्यक्तीस शिकारीचा, शेतीचा थोडा अधिक वाटा मिळत असे. ही आता जवळजवळ प्रथा पडू लागली. हवी असलेली वस्तू मागण्यासाठी प्रार्थना आणि ती वस्तू मिळाल्यावर उपकार आणि आभार. एक नवीन सूत्र सापडले होते मानवाला. 
            हळूहळू प्रार्थना आणि आभार यांबद्दल समीकरणे बदलली असावी. वेगवेगळ्या लोकांची प्रार्थना करून वेगवेगळ्या वस्तू मिळवल्या गेल्या असाव्यात. या देयक वर्गाला एक विशेष दर्जा दिला जाऊ लागला. ते सर्वसामान्यांपासून वेगळे आहेत, बलाढ्य आहेत, असे समीकरण हळूहळू जनमानसांत तयार होऊ लागले असावे. ते सर्वसामान्यांप्रमाणे असले, त्यांना आपापले संसार असले, तरीही ते काही तरी, कोणी तरी विशेष आहेत आणि आपली इच्छा पूर्ण करणारे आहेत, पण त्यांची इच्छा पूर्ण न झाल्यास ते कोप पावतात आणि शिक्षा देतात ही कल्पना रूढ होत गेली असावी. इथेच ‘देव’ नामक संज्ञेचा उगम झाला! यांना पूजले की, ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनाविरुद्ध केले की, ते कोप पावतात. ही एक समजूत धृढावत गेली. हे ‘देयक’ इतके बलशाली झाले की, ते आता समाजकंटकाविरुद्ध समाजाच्या रक्षणार्थ उभे राहू लागले. हादेखील माझ्या मते मानवाच्या उत्क्रांतीतलाच एक भाग होता. हे आकाशातून पडले नव्हते, तर मानवानेच स्वतःच्या इच्छेनुसार त्यांना हा दर्जा दिला होता. 
            मोकळा वेळ मिळाला किंवा संकटात सापडले की, माणसाला देव आठवतो. कामात असताना, डोळ्यासमोर काही लक्ष्य असताना सहसा देवसुद्धा आठवत नाही किंवा कुणाबद्दल दानवी विचारसुद्धा मनात येत नाहीत. थोर वृद्धांना, अपार शिक्षण आणि अनुभव ठायी असलेल्या व्यक्तीला गुरू किंवा आचार्य म्हणायची पद्धत रूढ झाली. याच आचार्यांनी देवाची व्याख्या तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनीच देवांना मूर्त रूप दिले. निसर्गात सगळीकडे देव कसा आहे हे त्या पशुसमान प्राण्याला मानववृत्ती देताना त्यांनीच पटवून दिले. माणसाच्या नवजात बाळाला सर्वस्व त्याची माता असते. पुढे चालू बोलू लागलेल्या बालकाला हट्ट करायला, काहीही मागायला हक्काची आई असते. तर काही (त्याच्या दृष्टीने कठीण) कामात मदत हवी असल्यास, सर्वाधीश त्याचा बाप असतो. लहान मुलांना इथवर नक्की कळलेले असते की, काही लागले तर आई आहे आणि कष्ट पडल्यास धावून येण्यास बाप समर्थ आहे. तेच बालक जेव्हा मोठे होते, आई-बापापासून वेगळे होते, तरीही त्याला मदतीसाठी कुणाची तरी गरज कायम भासते. बाप काही वर्षांनी दुबळा वाटू लागतो किंवा त्याच्या मृत्यूनंतर, तो एकेकाळी जसा सर्वाधीश होता तसा आता त्याला सर्वाधीश, बलाढ्य, कुठल्याही वेळी मदतीस धावून येणारा असा ‘बाप’ हवा असतो. त्याला एक  शक्तिशाली, कधीही नकारदर्शक नसलेला आणि ज्यावर विसंबून राहाता येईल, असा प्रेमळ बाप हवा असतो, पाठीराखा हवा असतो. तशीच काहीही मागितले तरी ‘नाही’ न म्हणणारी आई हवी असते. अशी सर्वशक्तिशाली आई, जी कधीही मदतीस धावून येईल. इच्छा पूर्ण करेल आणि आपले हट्ट पूर्ण करेल. समान भाषा, समान कार्यपद्धती, समान चालीरीती आणि समान भौगोलिक व्यवस्थापन यांमुळे या समाजाला एक विशिष्ट स्वरूप आले होते. त्यांची खाण्याची पद्धत, कपडे घालण्याची पद्धत, एकमेकांना अभिवादन करण्याची पद्धत यांत कमालीचे साम्य, नुसतेच सांभाळले जात नव्हते, तर ते सातत्याने पाळले जाऊ लागले. एखादी गोष्ट सांभाळली जाणे आणि पाळली जाणे यांत अंतर आहे. संभाळताना त्यात बदल करण्याची मुभा असते, तर पाळताना त्याची काटेकोर अंमलबजावणी अपेक्षित असते. इथेच पंथाचा जन्म झाला! पंथ म्हणजे मार्ग, रस्ता. दैनंदिन जीवनात ज्या मार्गाने आपण जावे जेणेकरून आयुष्य सुकर होईल तो पंथ! मन:शांतीसाठी दाखवलेला मार्ग तो पंथ. हा सर्वसमावेशक शब्द आहे, पण खूप खोल अर्थ घेऊन तो निपजला आहे. (क्रमशः)

-निखिल राजे ( ९०२८४९९९२१ )