आगीत २० एकरवरील उसाचे मोठे नुकसान

वीज वाहिन्यांच्या घर्षणातून घटना

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-13 15:42:08

लोकनामा प्रतिनिधी
निफाड: वीज वाहिन्यांच्या घर्षणामुळे तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील काथरगाव शिवारातील सहा ते सात एकर उसाला  आग लागून जवळपास वीस एकर उसाचे नुकसान झाले आहे.  
          सविस्तर वृत्त असे की, कैलास विश्वनाथ काळे, दिगंबर भाऊसाहेब वाघ, राजेंद्र अण्णासाहेब वाघ, रामचंद्र माधव वाघ, जगन्नाथ काशीनाथ काळे, किरण जगन्नाथ वाघ आदींसह सहा शेतकऱ्यांची वीस एकरावर एकाच ठिकाणी ऊसशेती आहे. वीज वाहिन्यांच्या घर्षणाने रविवारी (दि. १०) उसाने पेट घेतला. या आगीत उसाचे क्षेत्र भक्ष्यस्थानी पडले. येथील ग्रामसेवक सुनील शिंदे यांनी या घटनेची दखल घेत निफाड नगरपंचायतीकडील अग्निशमन दलाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून बंब पाठवण्याची विनंती केली. मात्र, निफाड नगरपंचायतीकडे अग्निशमन बंब उभा होता; परंतु त्यासाठी चालक नसल्याने व चालकास नगरपंचायतीच्या कामानिमित्त कळवणला पाठविल्याचे समजते. बंब काथरगाव येथे गेला असता तर ८० टक्के ऊस आगीपासून वाचला असता. पण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे संबंधितांना लाखोंची ऊसशेती गमवावी लागली. महावितरणने या वीज वाहिन्यांची दुरुस्ती करून न्याय द्यावा, अशी मागणी काथरगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.