सूर्योदय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. पगारे

जळगावला २०२५ मध्ये लोकवर्गणीतून संमेलन

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-13 16:01:40

लोकनामा प्रतिनिधी

नाशिक ः उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त सन २०२५ मध्ये जळगावला लोकवर्गणीतून तिसरे अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक, विचारवंत प्रा. डाॅ. म. सु. पगारे (जळगाव) यांची निवड करण्यात आली. ही माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली.          

मानवता-वादी विचारवंत प्रा. डॉ. पगारे यांचे ३७ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. दलित साहित्याचा इतिहास या साहित्य क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या संशोधन ग्रंथाची हिंदी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. मानवतावाद आणि बुद्धिझम या तत्त्वज्ञानाची मांडणी करणाऱ्या ‘बा, तथागता’ या विशाल काव्याच्या मराठीत दोन आवृत्त्या आल्या आहेत. हिंदीमध्येही अनुवाद प्रकाशित झाला आहे.           

यापूर्वी प्रा. डॉ. पगारे यांनी अनेक साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे पार पाडली आहे. यापूर्वी डॉ. प्रभा गणोरकर, गजलकार भीमराव पांचाळे यांनी या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.               

खानदेशच्या वाट्याला हा मान प्रथम मिळत असल्याने प्रा. डॉ. पगारे यांच्या निवडीला विशेष असे वेगळेपण प्राप्त झाले आहे. या अध्यक्षपदाच्या निवडीनिमित्ताने मानवतावादी विचारवंत प्रा. डॉ. पगारे यांचे खानदेशातील साहित्य, लेखक व मान्यवरांनी स्वागत केले.  संमेलन यशस्वितेसाठी शहराध्यक्ष साहेबराव पाटील, सचिव डी. बी. महाजन, गायत्री पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण लोहार, उपाध्यक्ष विनोद निळे प्रयत्नशील आहेत.

विविध भाषांतून व्याख्याने

प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी प्रथमच मराठी लोकसाहित्यात इहवाद व समाजभाषा विज्ञानाची मांडणी केली आहे. त्यांना लोकसाहित्यातील इहवादाचे जनक, असे संबोधले जाते. त्यांनी  अनेक कार्यक्रमांत विविध विषयांवर मराठी, हिंदी, इंग्रजी व अहिराणी भाषेतून व्याख्याने दिली आहेत. प्रा. डॉ. पगारे यांनी इटली, मलेशिया, दुबई, कराची, पुणे अशा अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय साहित्य परिषदेतून उद्घा‌टक, बीजभाषक व सत्राध्यक्ष म्हणून व्याख्याने दिली आहेत.