माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-14 11:49:37
नाशिक :- दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज ( दि.१४ नोव्हेंबर ) सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून हरिश्चंद्र चव्हाण यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
मालेगाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांनी २००९ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. २०१४ मध्ये त्यांनी भारती पवार यांचा २ लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता. भारती पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. दरम्यान,२०१९ मध्ये भारती पवार भाजपामध्ये आल्या. त्यानंतर भाजपाने हरिश्चंद्र पवार यांची उमेदवारी नाकारून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी १ लाख ९८ हजार ७७९मतांनी विजय मिळवला होता.
पंचायत समिती, जिल्हा परिषद, येथेही त्यांनी पदे भूषवली, दिंडोरीचे खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी एअर अँब्युलन्सने ते दिल्ली येथे गेले होते. भाजपशी एकनिष्ठ असलेले चव्हाण यांना २०१९ च्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने तिकीट दिले नव्हते. मात्र तरीही ते भाजपात राहून काम करत होते.
हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन झाल्याने दिंडोरीवर शोककळा पसरली आहे.