शंभर कोटी वसुलीप्रकरणी देशमुखांना क्लीन चीट नाही

चौकशी करणारे न्या. चांदीवाल यांचा दावा

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-11-14 12:05:43

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अहवालात आपण देशमुखांना क्लीन चीट दिली नसल्याचे एबीपी माझा न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या प्रकरणात योग्य पुरावे आयोगासमोर समोर येऊ दिले नाहीत, असे न्या. चांदीवाल यांनी म्हटले आहे. न्या. चांदीवाल आयोगाने आपल्याला क्लीन चीट दिल्यामुळेच अहवाल सार्वजनिक होऊ दिला जात नाही, असा आरोप देशमुख वारंवार करत आहेत.

         न्या. चांदीवाल म्हणाले की, अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिलेली नाही. मी माझ्या अहवालात क्लीन चीट हा शब्दच वापरला नाही. परमबीरसिंह यांनी जी माघार घेतली, त्याबद्दल मी माझ्या अहवालात टीका केली आहे. पण मी क्लीन चीट दिलेली नाही. पुरावा नाही असे म्हटले आहे. परमबीरसिंह, सचिन वाझे यांनी त्यांच्याकडे पुरावे असूनही दिले नाहीत. पुरावे दिले असते तर नक्कीच काही घडले असते. सचिन वाझे यांनी अजित पवार व शरद पवार यांची नावे घेतली. मात्र, ती नावे मी रेकॉर्डवर घेणार नाहीत, असे वाझेंना सांगितले. फडणवीसांना गुंतवण्याचाही प्रयत्न वाझे आणि देशमुखांनी केला. मात्र, ते रेकॉर्डवर घेतले नाही. राजकीय व्यक्तींना गुंतवून प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न दिसत होता. मात्र, मी ते होऊ दिले नाही.
मविआ सरकारच्या काळातील शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख व सचिन वाझे यांनी नंतरच्या काळात 'तेरी भी चूप, मेरी भी चूप', असे धोरण अंगीकारले होते. साक्षी व पुरावे असूनही ते दिले गेले नाहीत. ते पुरावे मिळाले असते तर पुढे काहीतरी घडले असते. माझ्या चौकशीत अनेक अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू होते. ठाण्याचे एक पोलीस उपायुक्त सातत्याने या सगळ्यात हस्तक्षेप करत होते. कोण कोणाला वाचवतंय किंवा अडचणीत आणू इच्छित आहे, हे कळायला मार्ग नव्हता, असे चांदीवाल यांनी सांगितले.
          सचिन वाझे यांनी शपथपत्रात उल्लेख केलेल्या अनेक गोष्टींवरून नंतर घूमजाव केले. त्यावेळी मला माहिती न देता परमबीरसिंह व सचिन वाझे यांची बैठक झाली होती. देशमुख व वाझे यांचीही भेट झाल्याचे मला समजले. माझ्या अहवालातील बाबी शासनाच्या पचनी पडणाऱ्या नव्हत्या. त्यात अनेक विस्फोटक गोष्टी होत्या, असेही निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सांगितले. 
           वाझे यांनी चौकशीदरम्यान मविआ सरकारच्या काळात पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करताना आर्थिक व्यवहार झाल्याचा उल्लेख केला होता. त्यांनी प्रतिज्ञापत्रात ही बाब नमूद केली नव्हती. चौकशी सुरू असताना त्यांनी हा विषय पुढे आणायचा प्रयत्न केला. त्यांनी विथ रेकॉर्ड हे सगळे समोर आणले होते, पण मी त्याला फार महत्त्व दिले नाही. वाझे यांनी चौकशीवेळी तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांचा एक व्हॉट्सअॅप मेसेज दाखवला होता. त्यात ४० लाखांचा उल्लेख होता, असे न्या. चांदीवाल म्हणाले.

माझ्याविरोधात पुरावे नाहीत : देशमुख

यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. न्यायमूर्ती चांदीवाल अहवालात क्लीन चीट असा शब्द नसेलही. मात्र, त्यांनी सरळ सांगितले आहे की, अनिल देशमुखांविरोधात आमच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. साक्षीत सचिन वाझे यांनी स्पष्ट सांगितले की, अनिल देशमुख यांनी मला पैसे मागितले नाहीत. मी त्यावेळी जेलमध्ये होतो, माझी व वाझे यांची भेट कशी होणार? चौदाशे पानांच्या या अहवालात सर्व साक्षी-पुरावे आहेत. माझी मागणी आहे की, अहवाल सार्वजनिक करावा, असे देशमुख यांनी सांगितले.