महागाई दराने गाठला उच्चांक

ऑक्टोबरमध्ये ६.२१ टक्क्यांची नोंद, १४ महिन्यांतील सर्वाधिक

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-14 12:36:05

लोकनामा प्रतिनिधी 
नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेच्या अनेक प्रयत्नांनंतरही देशात महागाई सातत्याने वाढते आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दर ६.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात हा दर ५.५ टक्के होता. मात्र, या महिन्यात महागाईने मागच्या १४ महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. यामुळे खाद्यपदार्थ, विशेषतः भाज्या व उत्पादित खाद्य वस्तूंच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.
          राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, उत्पादित खाद्य वस्तूंचा महागाई दर ९.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो सप्टेंबर महिन्यात ८.३६ नोंदवला गेला. भाज्यांचा महागाई दर ४२.१८ टक्क्यांवर वर पोहोचला आहे. हा दर सप्टेंबरमध्ये ३५.९९ टक्के नोंदवण्यात आला. याशिवाय फळांचा महागाई दरही वाढला आहे. जो सप्टेंबरमधील ७.६५ हून ८.४३ टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय कडधान्यांच्या महागाई दरातही किंचित वाढ बघायला मिळाली आहे. सप्टेंबरमधील ६.८४ टक्क्यांच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात हा दर ६.९४ टक्के नोंदवण्यात आला आहे. 
      मांस व माशांच्या महागाई दरातही २.६६ वरून ३.१७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, घरांच्या महागाईचा दरही सप्टेंबरमधील २.७८ वरून ऑक्टोबरमध्ये २.८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. दीड वर्षात महागाईच्या दराने विक्रमी उच्चांक गाठल्याने डिसेंबरमध्ये होणाऱ्या चलनविषयक धोरणाच्या बैठकीत (एमपीसी) रेपो दर 'जैसे थे' राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. गेल्या काही बैठकांपासून रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम आहे. अशातच आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत यात कोणता बदल होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपाययोजना आवश्यक

भाजीपाला व खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ होणे, हा चिंतेचा विषय आहे. देशाच्या काही भागांत अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव वाढले आहेत. याशिवाय आयात शुल्कात वाढ झाल्याने खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. या किमती सरकारने स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. 

- रजनी सिन्हा, अर्थतज्ज्ञ