स्वत:च्या पायावर उभे राहायला शिका

सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना सुनावले

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-11-14 12:46:06

मुंबई : शरद पवार यांचे फोटो व व्हिडिओंचा वापर करण्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फटकारले आहे. तुमच्या पक्षाच्या प्रचार साहित्यात शरद पवार यांचे फोटो किंवा व्हिडिओचा वापर कुठल्याही प्रकारे करू नका. जरा स्वत:च्या पायावर उभे राहायला शिका, अशा कठोर शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुनावले आहे.
            राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अजितदादा गटाचे घड्याळ चिन्ह गोठविण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यास नकार दिला. त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले. त्यात तुमचे उमेदवार, कार्यकर्त्यांना शरद पवारांचे फोटो व व्हिडिओ वापरू नका, अशा सूचना द्याव्यात, असे न्यायालयाने सांगितले. तुम्ही दोघांनी आपापल्या युद्धभूमीवर लक्ष केंद्रित करा. व्हिडिओ वगैरेंचा कधीकधी प्रभाव पडतो. दरवेळी मतदारांना प्रभावित करेल असे नाही. आपल्या देशातील जनता खूप हुशार आहे, त्यांना कोणी फसवू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले. 
         याच याचिकेत अजित पवारांचा पक्ष शरद पवारांचे फोटो वापरत असल्याचा दावा केला होता. यासंदर्भात न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठापुढे बुधवारी (दि. १३) सुनावणी झाली. त्यावेळी अजित पवार अजूनही आपल्या काकांच्या पुण्याईवर मत मागत आहेत, अशी माहिती शरद पवारांच्या पक्षाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात दिली. अजित पवार यांचा पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही, असे निदर्शनास आणले. त्याबाबतचे काही फोटो व पोस्टर्सही दाखवले.