निवडणुकीसाठी ‘लालपरी’ सज्ज!
नऊ हजार २३२ गाड्या बुक
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-14 13:21:20
नाशिक : राज्यात एकाच टप्प्यात होणारी विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग सज्ज आहे. मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट यंत्रे, बोटाला लावायची शाई आदी साहित्य आणि संबंधित मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याची आणि तिथून पुन्हा परत आणण्यासह मतमोजणीसाठीदेखील २३ नोव्हेंबरला नेण्याची-आणण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळावर सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी (दि. २०) मतदान पार पडणार आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतशी राजकीय प्रचार सभांच्या तोफा जोमाने धडाडत आहेत. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर अशा दोन दिवसांसाठी एसटीकडे तब्बल नऊ हजार बसगाड्यांची मागणी केली आहे. त्यांपैकी १९ नोव्हेंबरला मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाण्यासाठी आठ हजार ९७८ बसगाड्या वापरल्या जाणार आहेत आणि २० नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर यंत्र मतमोजणीच्या ठिकाणी नेण्यासाठी तेवढ्याच गाड्या वापरात असतील. तसेच २४५ बसगाड्या पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. प्रत्येक सजग भारतीय नागरिकाने देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपले बहुमूल्य मत द्यायलाच हवे. अर्थात २० नोव्हेंबरला राज्यात मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतील. अशात हजारोंच्या संख्येने बसगाड्या निवडणूक प्रक्रियेसाठी धावणार असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात नागरिकांच्या सोयीसाठी एसटीने गाड्यांचे योग्य ते नियोजन केले असेलच. परंतु तरीही नागरिकांनी गाड्यांची संख्या आणि वेळ पाहून प्रवास करणे जास्त सोयीचे ठरेल. जेणेकरून वेळेत मतदान होईल आणि आपले पुढचे वेळापत्रकही कोलमडणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एक हजार खासगी स्कूल बसेस आणि ४०० बेस्ट बसेस निवडणूक प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहेत. एसटीच्या ताफ्यात सध्या स्वमालकीच्या १३ हजार ३६७ बसेस आहेत. त्यातील नऊ हजार २३२ गाड्या राज्यातील ३१ विभागांना निवडणुकीच्या कामकाजासाठी देण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठीही एसटीच्या बसेस धावल्या होत्या. त्यावेळी मार्ग आणि किलोमीटरप्रमाणे भाडे ठरविण्यात आले. त्यातून एसटीला एका बससाठी जवळपास २४ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळाले. आता विधानसभा निवडणुकीतही याचप्रमाणे भाडेआकारणी होणार आहे.