गणेश गितेंच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहा

आडगाव सभेत शरद पवारांचे आवाहन

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-14 13:33:01

लोकनामा प्रतिनिधी 
नाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आडगाव परिसरातील सभेला झालेली गर्दी बघता विरोधकांना धडकी भरली आहे. वार्ध्यक्यातही जोशपूर्ण उत्साहात केवळ नाशिककरांसाठी रात्री उशिरा सभा घेऊन पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. नाशिक पूर्व मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते यांच्यासह नाशिकमधील चारही उमेदवारांच्या पाठीशी सर्वशक्तिनिशी उभे राहा, असे आवाहन शरद पवार यांनी केल्याने मतदारसंघात यंदा परिवर्तन निश्चित होइल, अशी सभेनंतर चर्चा आहे.
            यावेळी मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गिते, नाशिक पूर्वचे गणेश गिते, नाशिक पश्चिमचे सुधाकर बडगुजर, देवळालीचे उमेदवार योगेश घोलप, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खा. भास्कर भगरे, माजीमंत्री बबनराव घोलप, दत्ता गायकवाड, कोंडाजी आव्हाड, नाना महाले, सुनील बागूल, गजानन शेलार, विनायक पांडे उपस्थित होते.
             पवार म्हणाले की, नाशिक आणि नाशिक रोड परिसरातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आमची पूर्ण शक्ती तुमच्याबरोबर राहील. लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० खासदारांची आवश्यकता होती. सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी खबरदारी घेतली. इंडिया आघाडीमार्फत देशाची सर्व शक्ती दुसरी जाऊ नये, यासाठी प्रयत्न केले. भाजपला देशाच्या घटनेमध्ये बदल करायचा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर देश एकसंध आहे. घटनेत बदल झाल्यास सामान्य माणसाच्या अधिकारात बदल होईल. नाशिक पूर्वच्या  गणेश गिते, मध्यचे वसंत गिते, पश्चिमचे सुधाकर बडगुजर आणि देवळालीचे योगेश घोलप या उमेदवारांमागे आपण उभे राहिलो, तर नाशिकचे प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण शक्ती लावली जाईल. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर नाशिकचे प्रत्येक प्रश्न सोडवले जातील, असेही शरद पवार यांनी सांगितले. 

चळवळींचे गाव आडगाव!
चळवळींच्या गावांमध्ये आडगावचे नाव घेतले जात असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. एकेकाळी शेतकरी व कामगारांच्या विचारांचे गाव होते. अनेक इच्छुक होते, सर्वांना संधी देता येत नाही. तरुणांची शक्ती उभी केली. त्यांनी विचार पोहोचवला. आडगावमध्ये आयटी पार्क करण्याची गरज आहे. एक लाख लोकांना रोजगार मिळाला. जे पुण्याला होऊ शकते ते नाशिकला का नाही?. तरुणांची संख्या अधिक आहे. आयटी पार्कमुळे नाशिकचा विकास होईल.

‘गोडसे यांना योग्यवेळी संधी’  
पक्षाचे जगदीश गोडसे अनेक वर्षांपासून काम करत होते. त्यांनी एक शक्ती उभी केली आहे. त्यांनी आमचे काम लोकांपर्यंत पोहोचवले. मात्र यंदा त्यांना संधी देता आली नाही. मात्र संधी दिली नाही म्हणून ते घरी बसले नाहीत. त्यांच्या या भूमिकेची नोंद मी आणि आमचे सहकारी नक्कीच घेतील, त्यांना योग्य वेळी संधी मिळेल, असे आश्वासनही पवार यांनी दिले.