कार्तिक पौर्णिमा अर्थात देव दिवाळी
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-14 14:42:19
कार्तिक महिन्यात पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात, म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृत्तिका नक्षत्र असेल, तेव्हा भगवान श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यास शुभकाळ असतो, असे मानले जाते. दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला महत्त्व असले, तरी कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते.
हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठणी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी श्रीविष्णूची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्याने जीवनात आनंद मिळतो. तसेच जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. यावेळी कार्तिक पौर्णिमेला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी दान केल्यानेही विशेष लाभ होतो. कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथी १५ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल. कार्तिक महिन्याची पौर्णिमा तिथी १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर २ वाजून ५९ मिनिटांनी संपेल. परंतु कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग हा रात्री ९ वाजून ५५ मिनिटांपासून ते पहाटे २ वाजून ५९ मिनिटांपर्यंत आहे. (कार्तिक महिना- पौर्णिमा; आणि कृतिका नक्षत्र या काळात आहे). भगवान श्री कार्तिक स्वामी हे बल, बुद्धी, साहस आणि यशस्वीतेचे प्रतीक मानले गेले आहे, तसेच त्यांना शिवगणांचा सेनापती म्हटले जाते. म्हणजेच ज्ञान, संपन्नता, यशस्विता आणि इतर सर्व शुभ गुणांचे अधिपत्य श्री कार्तिक स्वामी यांच्याकडे आहे. म्हणूनच या पर्वणी काळात त्यांचे दर्शन घेणे अतिशय शुभ मानले गेले आहे.
हे दर्शन घेणे तर संपत्तीकारक आहे, असेही म्हटले जाते. कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर येणारे वर्ष हे धनसंपत्तीच्या दृष्टीने लाभदायक जाते, असा अनेकांचा अनुभव आहे. आपल्याला असलेली आर्थिक अडचण दूर होते, तसेच असलेले कर्ज या पर्वणी काळात दर्शन घेतल्यास फेडली जातात, कर्जमुक्त होता येते. वर्षभरात कार्तिक स्वामींचे दर्शन पौराणिक संदर्भानुसार स्त्रियांसाठी वर्ज्य असले, तरी या काळात स्त्रियादेखील भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात. कार्तिक स्वामींचे दर्शन घेताना ज्यांना जे- जे शक्य असेल, ते करावे व त्या वस्तू अर्पण कराव्यात.
दर्शनाच्या वेळी त्यांना पाण्याने भरलेला कमंडलू, २७ रुद्राक्षांची माळ, कमळाचे फूल किंवा कोणतीही पांढरी फुले अर्पण करावेत, आरती करावी. मोरपीस वाहावे. मनातील इच्छा सांगून प्रार्थना करावी. या काळात विद्यार्थ्यांनी यशासाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जितक्या वेळा म्हणता येईल तितक्या वेळा पण शक्यतो अकरा वेळा तरी म्हणावे. या काळात किंवा त्या दिवशी मद्यपान, मांसाहार वर्ज्य करावे व ब्रह्मचर्य पालन करावे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भगवान कार्तिक स्वामीची मंदिरे आहेत. त्यात जळगाव येथे निवृत्तीनगर भागात, डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, जळगाव, पिंप्राळा, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव (जि. जळगाव), अमळनेर (जि. जळगाव), शिरपूर (जि. धुळे), छत्रपती संभाजीनगर, पर्वती, हडपसर (पुणे). पनवेल, पुणतांबा (जि. अहिल्यानगर), राजगुरूनगर (जि. पुणे), अंजनेरी (जि. नाशिक), ठाणे, उल्हासनगर. अचलपूर (जि. अमरावती). मूर्तिजापूर. नागपूर. कुरुंदवाड (जि. सांगली), कराड, रहिमतपूर, पिरवाडी (जि. सातारा), राजापूर (जि. रत्नागिरी), मुळदे (जि. सिंधुदुर्ग), पंचगंगेच्या तीरावर आणि श्री महालक्ष्मी मंदिराच्या आवारात (कोल्हापूर), डोंबिवली, वसई या ठिकाणी तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळ घाटपुरी येथे कार्तिक स्वामींचे पुरातन मंदिर आहे. वरच्या भागात पंचमुखी हनुमान मंदिर आणि खाली गाभाऱ्यात कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. वर्षात फक्त एकदाच कार्तिक पौर्णिमेला हे मंदिर उघडण्यात येते.
पुराणातील कार्तिक स्वामींची नावे अशी ः कार्तिकेय, महासेन, शरजन्मा, षडानन, पार्वतीनंदन, स्कंद, सेनानी, अग्निभू, गुह, बाहुलेय, तारकजित, शिखिवाहन, शक्तिश्वर, कुमार, क्रौञ्चदारण, आग्नेय, मयूरकेतू, धर्मात्मा, अशी अजूनही नावे आहेत.
श्री कार्तिक स्वामींचा परिवार : पिता - भगवान शिव, माता- भगवती पार्वती, भाऊ- गणेश (छोटा), बहीण- अशोका सुंदरी, पत्नी- देवसेना आणि कुरुवल्ली, वाहन- मोर.
प्रज्ञाविवर्धन स्तोत्र
अस्य श्रीप्रज्ञाविवर्धन-
स्तोत्रमंत्रस्य सनत्कुमारऋषि:।
स्वामी कार्तिकेयो देवता।
अनुष्टुप् छंद:।
मम सकल विद्यासिद्ध्यर्थं
जपे विनियोग:।
श्रीस्कंद उवाच।।
योगीश्वरो महासेन:
कार्तिकेयोS ग्निनन्दन:।
स्कंद:कुमार: सेनानी:
स्वामिशंकरसंभव: ।।१।।
गांगेयस्ताम्रचूडश्च
ब्रह्मचारी शिखिध्वज:।
तारकारिरुमापुत्र:
क्रौंचारिश्च षडानन: ।।२।।
शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्ध:
सारस्वतो गुह:।
सनत्कुमारो भगवान्
भोगमोक्षफलप्रद: ।।३।।
शरजन्मा गणाधीशपूर्वजो
मुक्तिमार्गकृत।
सर्वागमप्रणेताच
वांछितार्थप्रदर्शन: ।।४।।
अष्टाविंशति नामानि
मदीयानीति य: पठेत्।
प्रत्यूषं श्रद्धयायुक्तो
मूको वाचस्पतिर्भवेत् ।।५।।
महामंत्रमयानीति मम
नामानुकीर्तनम्।
महाप्रज्ञामवाप्नोति
नात्र कार्या विचारणा ।।६।।
इति श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्रं संपूर्णम्।
त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाला भगवान शंकराने याच दिवशी ठार केले होते, म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी
शिवमंदिरात ७५० वातींची त्रिपुरारी वात लावली जाते. तसेच घरोघरी,
मंदिरांत दिव्यांची आरास केली जाते. नदीपात्रात दिवे सोडले जातात. घाटावरही दिव्यांची आरास करून आनंदोत्सव साजरा करतात. तुलसीच्या लग्नाचा हा शेवटचा दिवस असतो.
-दिलीप देशपांडे ( ८९९९५६६९१७ )