पंथाचा धर्म कसा झाला, धर्म म्हणजे काय?

Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-14 14:47:54

समाजाला आता एका पंथाचे रूप आले. त्यालाच सगळे सनातन पंथ म्हणू लागले. सनातन, ज्याला अंत नाही असा! जो शाश्वत आणि अचल आहे असा. त्याकाळी या पंथाला काहीच नाव नव्हते खरे म्हणजे! कुणालाही नाव हे ओळखीसाठी दिले जाते. ओळख असताना किंवा तसे दुसरे कोणी समोर नसताना आपण नावाने हाक मारत नाही. आपल्या पंथाबद्दल गौरवोद्गार काढत कुणी जेव्हा त्याचे वर्णन केले तेव्हा ते 'तो सनातनी आहे', असे केले असावे. हे ऐकलेल्या माणसाने पुढे तो सनातनी पंथ आहे म्हणून नाव रूढ केले असावे. पुढे आलेल्या वेगवेगळ्या पंथाचे, तुम्ही हिंदू का? आम्ही मुस्लिम. तुम्ही मुस्लिम का? आम्ही ख्रिश्चन. तुम्ही ख्रिश्चन का? आम्ही ज्यू वगैरे वगैरे.. झाले असावे. येशू ख्रिस्तालाही काही ख्रिश्चन धर्म काढायचा नव्हता. त्याच्या अनुयायांना रोमन, ख्राइस्टचे अनुयायी म्हणून ख्रिश्चन म्हणू लागले. तसेच मोहम्मदचे म्होमेडिअन. बुद्धाचे बुद्ध वगैरे.. सिंधू नदीच्या पलीकडचे, सिंधुस्थान किंवा हिंदुस्थानचे हिंदू झाले.  
           आता या पंथाचा धर्म कसा झाला, ते बघूया. धर्म म्हणजे काय?  इथे खूप वेगवेगळी उदाहरणे देता येतील. प्रवाही असणे हा पाण्याचा धर्म; भाजून काढणे, चटके देणे हा अग्निचा धर्म! मुळे जमिनीत घट्ट रोवून एका जागी ध्यानस्थ बसून रहाणे हा झाला झाडांचा धर्म, तर स्वच्छंदीपणाने मन मानेल तसे वाऱ्याबरोबर पंख पसरून हिंडत राहणे हा झाला पाखरांचा धर्म! चंद्राचे पृथ्वीभोवती फिरणे हा त्याचा धर्म, तर पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे हा तिचा धर्म! अवघे चराचर आपापला धर्म सांभाळून असते. हे सगळे सिद्ध करतातच की, कर्म म्हणजे धर्म! पण या कर्माला सातत्य असावे लागते आणि त्याला एखादा हेतू असावा लागतो, एखादे निश्चित ध्येय असावे लागते. माणसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे आचरणात आणायला लागणारे धर्मही वेगवेगळे असतात. शिक्षण घेत असताना विद्यार्थीधर्म, लग्न होऊन संसारात पडल्यावर गृहस्थधर्म, पतीधर्म, पत्नीधर्म, पुत्रधर्म, पिताधर्म, माताधर्म, शेजारधर्म... सगळे धर्म त्या त्या भूमिकेच्या मागणीप्रमाणे बदलत असतात. शिवाय उत्क्रांतीच्या सगळ्यात वरच्या पायरीवर उभे असल्याने बरोबरीच्या तसेच खालच्या पायरीवरच्या आपल्या भावंडांबद्दल मनात आपुलकी, करूणा जागवणारा मनुष्य धर्म असतोच. धर्म शब्द तेव्हा नेहमी आपण कर्तव्य म्हणूनच वापरतो. सांगायचे एवढेच की अव्याहत, सातत्याने, एखादे हेतुपुरस्सर करीत राहिलेले काम म्हणजे धर्म! परंतु या धर्माच्या व्याख्येत देव आणि दानव कुठून आले असावेत?. वर दिलेल्या धर्माच्या व्याख्येत चांगला-वाईट असा भेदभाव केलेला नाही. अव्याहत, हेतुपुरस्सर आणि सातत्य, या तीनही शब्दांत सगुण किंवा दुर्गुण हे भाव आढळत नाहीत. तेव्हा धर्म त्याकाळच्या देवांनाही लागू होता आणि दानवांनाही! घेणाऱ्यापेक्षा देणारा हा नेहमीच श्रेष्ठ वाटणे हा मनुष्य स्वभाव धर्म आहे. त्याकाळच्या ब्राह्मण वर्गाने या देवांची उपासना कशी करायची हे ठरवून दिले. त्यांनाच आपण व्रत-वैकल्ये म्हणू लागलो. या पूजाअर्चना वर्षातल्या ठराविक वेळी केल्या तर देव प्रसन्न होतात हे बिंबवून दिले. आणि त्या काळात उगवणाऱ्या धान्यांचा प्रसाद देवांना चढवला तर ते प्रसन्न होतात हे समजावून दिले. या ठराविक काळात करायच्या पूजाअर्चना यांनाच कालांतराने सणांचे रूप आले. आता त्यामध्येदेखील प्रत्येक वेगळ्या झालेल्या समाजात भौगोलिक आणि वातावरणाच्या परिस्थितीनुसार बदल घडत गेले आणि ते बदल रूढी म्हणून कायम झाले. वर्षानुवर्षांच्या काळानुसार तेच परंपरा म्हणून अस्तित्वात आले. हे देव सर्वशक्तिमान आहेत. या धर्तीचे उगमकर्ते तेच आहेत आणि नष्टकर्ते तेच आहेत. हेदेखील पटवून दिले.
            मनुष्याचा मानव झाला होता. मन + आव(र) = मानव. मनाला आवर घालू शकतो तो मानव. मानवाला मेंदू वापरायला आवडायला लागला होता. एकाच वेळी अनेक विचार मनात येत होते. त्याचबरोबर काळज्या, चिंतादेखील त्रास देऊ लागल्या होत्या. ब्राह्मण वर्गाला उपाय सापडला होता. ‘देवावर सोपवून निर्धास्त हो!’ हा त्यांचा मंत्र! आता कुठल्याही कामात व्यत्यय आला, चिंता वाटली, काळजी सुरू झाली की, हे कार्य देवावर सोडून निर्धास्त राहा हा त्यांचा मंत्र होता. त्या वेळेपुरती ती काळजी, ती चिंता दूर होई. माणूस आपल्या कामात व्यग्र होई. काळजी घ्यायला देव समर्थ आहे ही भावना मनात बळावत होती आणि त्याला हातात असलेल्या कामात लक्ष लागे. हातातले काम हातावेगळे झाले की, पहिल्या अडकलेल्या कामावर तोपर्यंत कुणीतरी तोडगा सुचवलेला असे किंवा त्यालाच सापडलेला असे. झाले, ते काम ही निर्विघ्न पार पडलेले असे. अशा प्रकारे अडल्या वेळेस देव धावून आलेला असे. यात देवाचा प्रत्यक्षात सहभाग काहीही नसला, तरीही त्या वेळेपुरती मिळालेली मन:शांती हा खूप मोठा फायदा झाला होता. ‘गरजेला देव धावून येत होता!’ चेतन- अचेतन अशा प्रत्येक वस्तूचा धर्म होता आणि आहे. या धर्मात किंवा सोप्या भाषेत कर्मात, कामात जर कुणाची अशी मदत होऊ लागली तर हा खूप मोठा फायदा मानवाला होऊ लागला.  कामात अडचण देवाची प्रार्थना, कर्म/धर्म सुरळीत चालावे देवाची प्रार्थना.  हे समीकरण पुढे 'धर्मा'शी निगडित होत गेले. 
          'धर्म म्हणजे करावयाचे काम' हे आता देवाशिवाय अशक्य झाले होते. काहीही काम करायचे म्हणजे देवाचा कौल घेणे क्रमप्राप्त झाले. देवांचे आशीर्वाद अनिवार्य झाले. कुठलेही कर्म देवाने सुरू होऊन देवापाशी थांबायला लागले. कर्म/धर्म = देव हे समीकरण मनाशी घट्ट बसू लागले. मानव संपूर्णत: देवावर विसंबू लागला. धर्म देवाशिवाय असंभव, अनिवार्य आणि अशक्य करून ठेवला. ते आजतागायत बदलले गेले नाही. एक परमात्मा आहे, ईश्वर आहे, तारणकर्ता आहे, तो सगळे पाहून घेईल. त्याच्यावर श्रद्धा ठेवा, काळजी सोडा आणि निश्चिंत राहा हे पटवून देण्यात त्याकाळचा ‘सुशिक्षित’वर्ग यशस्वी झाला होता. दिवसोंदिवस कामाचे लोढणे वाढलेला इतर कामकरी वर्ग त्या कल्पनेला तयार झाला. देवांचे अस्तित्व कुठल्या कारणाने उदयास आले आणि कुठे जाऊन थांबले हे पाहाता आश्चर्य वाटते. कालांतराने याच देवांचे अस्तित्व हजारो वर्षांपूर्वी होते, यावर माणूस विश्वास ठेवू लागला. एवढेच नाही, तर मनावर बसलेला हा पगडा एवढा जबरदस्त झाला की, आता त्याला देवाचे आकार दगडात, डोंगरात, दऱ्या-खोऱ्यांतसुद्धा दिसू लागले. देवांबद्दल सांगितलेल्या कथा, दंतकथा खऱ्या वाटू लागल्या. ‘तात्पुरता देवावर विश्वास ठेवून काम कर’ या कल्पनेपासून ‘संपूर्ण वेळ देवासाठी घालव’ इथपर्यंत मनुष्य येऊन ठेपला.  इथेच विचार करायची वेळ आली आहे. (क्रमशः)
-निखिल राजे ( ९०२८४९९९२१ )