पंतप्रधान नेहरू अन् बालदिन...
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-14 14:53:46
आपल्या वाचनात निरनिराळे विषय येतात. त्यामधून आपल्याला एकेक गोष्टी कळतात, उलगडत जातात. काही वेळा एकच विषय विविध लेखांतून आपण वाचतो आणि त्यामधून आपल्याला त्या विषयातील बारकावे वा त्या विषयाबद्दलची वेगवेगळी माहिती, मते किंवा त्यामधील विविध पैलूंचे आकलन होते.
मध्यंतरी एक छान लेख वाचनात आला, प्रा. प्रकाश पवार यांचा. त्यामध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘पंतप्रधान नेहरू’ या मौज प्रकाशनाच्या पुस्तकाबद्दल लिहिले आहे. ते वाचून हे पुस्तक वाचायची खूप ओढ लागली खरी.
या पुस्तकामध्ये त्यांनी नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी नेहरूंच्या नेतृत्वाची जडणघडण, नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल, काश्मीर आक्रमण, काश्मीरसाठी राज्यघटना, सरहद्दीचा तंटा, चीनचे आक्रमण, नेहरूंचा नवभारत, नेहरू : पंतप्रधान आणि माणूस अशा उपप्रकरणांत खूप अभ्यासपूर्ण रितीने प्रकाश टाकला आहे. आपल्याला बदलत्या काळानुसार विज्ञानाची महती पटलीयं हे खरे, पण या पुस्तकात सांगितलेय, नेहरूंनी विज्ञानाचं महत्त्व आधीच ओळखलं होतं. म्हणून त्यांनी आय.आय.टी. या जगभर प्रसिद्धी आणि मान्यता पावलेल्या शिक्षण संस्थेची वेगवेगळ्या पाच ठिकाणी उभारणी केली. त्याचबरोबर दिल्ली, म्हैसूर, पूणे येथे राष्ट्रीय भौतिक विज्ञान प्रयोगशाळा उभ्या केल्या. १४ नोव्हेंबर, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. त्यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा केल्या जातो. आज या बालदिनानिमित्त समस्त गोंडस, निरागस बालकांना आणि वय कितीही असो, पण मन मात्र अजूनही बालकांसारखं निरागस असणाऱ्या व्यक्तींना म्हणजेच प्रतिबालकांना म्हणू हव तरं, या समस्त मंडळींना बालदिनाच्या शुभेच्छा!
खरोखरच लहान मुलं खूप निरागस असतात. साधारणतः सुरवातीचे एक वर्ष तरी, म्हणजे स्वार्थ या शब्दाची ओळख होईपर्यंत तरी त्यांचा हा निरागसपणा खूपच लोभस असतो. पहिलं एक वर्ष फक्त दूध, घरच्यांचं प्रेम, आईची ऊब आणि शांत झोप इतक्या माफक अपेक्षा पूर्ण झाल्या तर ब्रह्मांड सुख मिळतं या लहानग्यांना. त्यांची निरागसता, लडिवाळपणा त्यांच्यात आपल्याला अधिकाधिक गुंतवत जातो. अगदी जाहिरातीत दाखवितात तसं गोरगोमटं बाळं असो किंवा निसर्गाच्या सान्निध्यात कडुलिंबाच्या झाडाला बांधलेल्या झोक्यात मुठी चोखत पहुडलेलं अस्सल गावरानी बाळं असो, दोघेही तेवढेच निरागस, हवेहवेसे आणि आपलं मनं मोहून घेणारे. बालदिन म्हटलं की, नजरेसमोर येतात कधी निरागस, कधी नटखट, कधी हट्टी तर कधी लडिवाळ बालके. काही वर्षे शिक्षकी पेशा पत्करल्याने विद्यार्थी म्हणूनही तसा लहान मुलांशी जास्त संपर्क आला. त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळ्या रूपांचे अनेक विभ्रम नजरेसमोर तरळतात. आपल्या मुलाने चालण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल, नुकतेच बोलायला लागल्यावरचे बोबडे बोल, नोकरीवरून परत आल्याक्षणीच त्याचे माझ्याकडे झेपावणे, माझ्या बाहेरून यायच्या वेळी त्याचे दाराआड लपणे या सगळ्या खूप अवर्णनीय आनंद देणाऱ्या गोष्टींच्या आठवणींना या दिवसाच्या निमित्ताने परत एकदा उजाळा मिळतो.
बालदिन असला की, आठवतो तो लहान मुलांनी केलेला एकेक हट्ट. आणि त्यामुळेच आठवते ती अकबर, बिरबलाची लहान मुलासारख्या वागण्याची गोष्ट. खरंच मनापासून पुरवाव्या वाटतात त्यांच्या इटुकल्या पिटुकल्या मागण्या. लहान मुलं ज्या लाडीगोडीने लडिवाळपणे, गळ्यात हात टाकून आपल्याकडे त्यांच्या मागण्या करतात नं तेव्हा सगळी सुखं फिकी वाटतात या सुखापुढे. त्यांच्या मागण्या असतात खरतर छोट्या, पण त्या मागण्यांची पूर्तता झाल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मात्र भलामोठा. बरं लहान मुलांची एक खासियत आहे, ती अगदी निरागस दिसत असली, तरी स्वतःच्या मागण्या गळी उतरवण्याच्या बाबतीत अतिशय बिलंदर. ही निरागस दिसणारी बालके पालकांना बऱ्याचदा अडचणीत आणतात हेही खरंच. १४ नोव्हेंबरच्या निमित्ताने ‘पंतप्रधान नेहरू’ हे न्या.चपळगावकर यांचं पुस्तक वाचावंसं वाटलं आणि आज बालदिनाच्या निमित्ताने लहान मुलांचा लडिवाळपणा आठवणीत आला.
-कल्याणी बापट (केळकर) ९६०४९४७२५६