अहंकारी नाठाळ मन
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-14 15:04:23
मनाला वळण लावणे ही गोष्ट कार्यवाहीत आणण्यासाठी फार अवघड आहे. शरीराला, बुद्धीला वळण लावणे हे त्या मानाने सोपे. वाघ, सिंह कह्यात आणता येतात, पण मांजर कह्यात येऊ शकत नाही. तसेच मनाचेही आहे. या नाठाळ मनाला एकदा अहंकाराची जोड मिळाली की शरीराचे, बुद्धीचे, विवेकाचे त्याच्यापुढे काही चालत नाही. असे अहंकारी नाठाळ मन ज्याचे आहे, त्याचेच वर्णन भगवान या श्लोकात करीत आहेत.
ये त्वेतदभ्यसूयन्तो
नानुतिष्ठन्ति मे मतम।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि
नष्टानचेतस: ।।
नाठाळ मन इंद्रिय भोगापलीकडे काही पाहत नाही. इंद्रियाचे लाड पुरविणे हेच त्याला सर्वस्व वाटते. कितीही भोग भोगले तरी त्याचे समाधान होत नाही.
एका सुभाषितकाराने म्हटले आहे,
जामातो जठरं जाया
जातवेदो जलालय:।
पूरिता नैव पूर्यंन्ते
जकारा: पश्चदुर्भरा: ।।
जावई, पोट, बायको, अग्नी आणि समुद्र यांना कितीही दिले तरी त्यांची तृप्ती होत नाही. पण सर्वांवर ताण मनाची आहे. शरीर थकते, इंद्रिये दुबळी होतात, पण मनाची हाव संपत नाही आणि असे हे मन मग काही एकून घ्यावयासही सिद्ध नसते.
मनाला वळण लावण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. ते चंचल, आडदांड, हट्टी आहे. ते असे आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही. बंध, मोक्ष, प्रगती-परागती हे सर्व मनावर अवलंबून असल्याने प्रयत्न अधिक निग्रहाने आणि सातत्याने करावे लागतात. गीतेत अर्जुनाने मन कसे आवरावे, असा प्रश्न भगवंतांना विचारल्याचा उल्लेख आहे. भगवंतांनी अभ्यास आणि वैराग्य यांच्या बळावर मन आवरावे, असे सांगितले आहे. अर्जुनाला सांगितलेला मार्ग कोणाच्याही उपयोगाचा आहे. सध्याच्या काळातही तो आमच्या उपयोगाचाच आहे. अभ्यास म्हटले की कशाचा करावयाचा? कसा करावयाचा? हे प्रश्न उपस्थित होतात आणि त्यासाठी श्रेष्ठ, अनुभवी माणसांचे मार्गदर्शन पत्करावेच लागते. ते जे सांगतील, जो उपदेश करतील, तो आदराने मानावा लागतो. उपदेश आणि उपदेशक यांच्याविषयी आदर नसेल, पूज्य बुद्धी नसेल, भक्तिभाव नसेल तर नुसते ऐकावे अशीही इच्छा होत नाही. आणि काही कारणाने ऐकले वा ऐकणे भागच पडले तर ते आचरणात आणण्यास योग्य आहे असेही वाटत नाही. यात काय विशेष सांगितले? हे तर आम्हालाही ठाऊक होतेच. याने काय होणार आहे? असे विचार त्याच्या मनात येतात आणि मग योग्य उपदेशाकडे ही मन:पूर्वक पाहिले जात नाही.
स्वतः सुधारणे, चांगले होणे हा एकच आपत्तीतून तरून जाण्याचा मार्ग आहे.
- स्वामी वरदानंद भारती
शब्दांकन - सतीश निरंतर