वजन कमी केल्यावर विद्याकडे चित्रपटांची रांग
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-11-14 16:21:08
भुल भुलैया-३’ या चित्रपटातील मोंजुलिकाच्या भूमिकेतील विद्या बालनला पाहून सगळ्यांचाच भुवया उंचावल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे, या चित्रपटात पूर्वीसारखीच सडपातळ बांध्याची विद्या बालन बघायला मिळाली. या भूमिकेसाठी विद्याने तिचे वजन खूप कमी केले आहे. आणि हेच तिच्यासाठी खूप आव्हानात्मक, संघर्षात्मक, कठीण होते. कारण गेल्या पाच-सहा वर्षांपासून, विशेषत: ‘द डर्टी पिक्चर’ या सिनेमानंतर विद्या खूप स्थूल झाली होती. सिल्कच्या भूमिकेसाठी तिने वजन वाढवले, पण त्यानंतर तिचे वजन काहीही केले तरी कमी होत नव्हते, तर वाढतच होते. विद्या या काळात खूप निराश झाली होती. कारण तिच्या संपूर्ण करिअरवरच या वाढत्या वजनाचा परिणाम झाला होता. तिला भूमिकाच मिळेनाशा झाल्या होत्या. हा काळ विद्यासाठी खूप वाईट होता. म्हणूनच भूलभुलैयातील लूकबाबत विद्या भरभरून बोलली आहे. मला हार्मोनल समस्या निर्माण झाल्या होत्या. त्या सतत वाढत होत्या. त्यावर उपचार सुरू असतानाही माझे वजन कमी होत नव्हते. व्यायाम केल्यास वजन कमी होण्याऐवजी ते जास्त वाढत होते. माझे शरीर कोणत्याच प्रक्रियेला प्रतिसाद देत नव्हते. बॉडी शेमिंगच्या टीकेला मी सामोरी गेले. मी मनातून खचत होते, पण अखेरीस माझे शरीर जसे आहे तसे स्वीकारून माझ्या शरीरावर प्रेम केले. आता ते मला जसे हवे तसे नाही. त्यामुळे मी त्याचा द्वेष करू शकत नाही, हे मी स्वत: माझ्या मनाला समजावले. यादरम्यान वाढलेल्या वजनासह काही चित्रपटपण केले. त्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि शेवटी मी यशस्वी झाले. मी कधी विचारही केला नव्हता अशा भूमिका मला बारीक झाल्यानंतर मिळत आहेत, असे विद्याने म्हटले आहे.