बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली ; मोदी

संभाजीनगर सभेत मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-11-15 12:18:32

छत्रपती संभाजीनगर/मुंबई : या जिल्ह्याचे नाव पूर्वी औरंगाबाद होते. या जिल्ह्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिले जावे, अशी मागणी सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आमच्या महायुतीच्या सरकारने पूर्ण केले. राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मात्र, ते बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. महायुतीचे सरकार आल्यावर अवघ्या काही महिन्यांत आम्ही बाळासाहेबांची अपूर्ण इच्छा पूर्ण केली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी गुरुवारी (दि. १४) छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते.

प्रचार सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक यंदा ही दोन विचारधारांमधील लढाई आहे. या निवडणुकीत एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त उभे आहेत, तर दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्यांची टोळी आहे. काही लोक असे आहेत, जे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्यांना आपला आदर्श मानतात. तर, आमच्या बाजूला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे लोक आहेत. तुम्हाला (जनतेला) असं वाटत नाही की, हे लोक महाराष्ट्राच्या अस्मितेविरोधात आहेत? आम्ही या जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर नामांतर केल्यानंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला तो निर्णय खूप झोंबला. त्यांचे काही सहकारी न्यायालयातदेखील गेले. त्यांनी आमच्या या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने नेहमीच सत्ता मिळवण्यासाठी समाजा-समाजांचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला आहे. विकासाऐवजी फोडा आणि राज्य करा, ही त्यांची नीती राहिली आहे.
           काँग्रेस नेहमीच आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे. देशाचा विकास त्यांना नेहमीच खुपत आला आहे. समाजांमध्ये फूट पाडणे आणि सत्ता काबीज करणे हेच त्यांचे आजवरचे धोरण राहिले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील समाजांना फोडण्याचे षडयंत्र काँग्रेसने रचले. परंतु आम्ही त्यांना यामध्ये यशस्वी होऊ देणार नाही. देशाला दहा वर्षांपासून ओबीसी पंतप्रधान लाभला आहे. मात्र हेच काँग्रेसला खुपतंय. काँग्रेसचे नेते परदेशामध्ये जातात आणि खुलेआम घोषणा देतात की, आम्ही आरक्षण संपवून टाकू. आता ते महाविकास आघाडीतील पक्ष महाराष्ट्रातील छोट्या छोट्या जातींमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत.

‘काँग्रेसचा गरिबी हटावचा खोटा नारा’

नवी मुंबईतील सभेत बोलताना मोदींनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. काँग्रेसने गरिबी हटावचा खोटा नारा दिला. गरिबांना लुटण्याचे काम केले. महाराष्ट्रातील सरकार महिलांना डबल लाभ देत आहे. मात्र महाविकास आघाडीवाले या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले होते. काँग्रेसवाले द्वेषाचे विष पेरण्याचे काम करत आहेत. जातीच्या आधारावर वाद लावण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे. त्यामुळे ‘हम एक है तो सेफ है!, असं म्हणत मोदींनी जोरदार हल्लाबोल केला.