पवार घराण्यातील कटुता दूर होईल असे वाटत नाही
अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-11-15 13:11:30
मुंबई : राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल, असे मला वाटत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हे वक्तव्य करून अजित पवार यांनी एकप्रकारे आगामी काळात शरद पवार यांच्याशी पुन्हा जुळवून घेणे शक्य नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शरद पवार व अजित पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेला तूर्तास स्वल्पविराम मिळण्याची शक्यता आहे.
यावेळी अजित पवार यांनी अलीकडे त्यांच्यावर कडाडून टीका करणारे त्यांचे बंधू व युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्याबाबतही भाष्य केले. माझा भाऊ माझ्यावर फार नाराज आहे. तो फारच टोकाचे बोलायला लागला आहे. कशामुळे त्याला असे वाटायला लागले? त्याचा स्वभाव असा का झाला? हे कळायला मार्ग नाही. मी राजकीय भवितव्य पणाला लावले, असे मला वाटत नाही. ही लढाई आमच्या मतदारांनी हातात घेतली आहे. जसे लोकसभेला त्यांनी ठरवले होते, सुप्रिया सुळे आणि विधानसभेला दादा त्या पद्धतीने ते करतील, असे अजित पवार यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आपण शरद पवार यांच्याशी संपर्कात नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी मी एक-दोन वेळा फोनवर बोललो. भाऊबीजेला मी सकाळी पावणेसातला बाहेर पडलो. तेव्हा सांगितले होते की, सकाळी साडेसहाला जेवढ्या बहिणी येतील, त्यांची भाऊबीज करून मी बाहेर पडणार. तीन बहिणी आल्या. त्यांची भाऊबीज करून मी बाहेर पडलो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.