दोस्तीच्या दुनियेतील दिलदार मनाचा राजा
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-15 13:33:39
सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड गावाचे भूमिपुत्र माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. त्यानिमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप!
अन्यायविरुद्ध दोन हात करण्याची धमक असो की, विविध विषयावरील सामाजिक आंदोलन असो, आदिवासींवरील अन्याय असो, स्पष्ट बोलणारा व अन्यायविरुद्ध संघर्ष करणारा नेता म्हणून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रश्न असो, अथवा लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वप्रथम जनता दरबार भरवून नागरिकांच्या सामाजिक समस्या त्याच ठिकाणी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना बोलावून किंवा फोनवरून समस्या मार्गी लावण्याची पद्धत सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यात दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सुरू केली. जिल्हा परिषदेचे समाजकारण सभापती असल्यापासून सुरू झालेला हा सिलसिला गेली ४० वर्षे कायम होता. त्यांच्या लोकप्रियतेचे गमक म्हणजे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमधील त्यांचा मैत्रिपूर्ण वावर. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली.
२५ डिसेंबर १९५१ला प्रतापगड (ता. सुरगाणा) येथे जन्मलेले हरिश्चंद्र चव्हाण यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्येदेखील उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांची ख्याती होती. उत्कृष्ट कबड्डीपटू, कुस्तीपटू तसेच हॉलीबॉल या खेळामध्ये तर ते राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले होते. महाविद्यालयीन जीवनामध्ये कवी असलेल्या चव्हाण यांना खरंतर पुढे राजकारणामध्ये आवड निर्माण झाली. लहानपणापासूनच दहा ते बारा किलोमीटर पायी चालणे हे त्यांचे नित्यचेच असे. त्यामुळे जीवनामध्ये त्यांना व्यायामाची कधी गरज पडली नव्हती. आहारदेखील जो समोर येईल तो आनंदाने त्याचा स्वीकार करायचा. कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सुरगाणा तालुक्यातील दुर्गम भागातील प्रतापगडचे रहिवासी हरिश्चंद्र चव्हाण यांनी प्रथमतः आपल्या नेतृत्वाच्या कौशल्याने प्रतापगडचे सरपंचपद ते जिल्हा परिषद सदस्य, समाजकल्याण सभापती, तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदापर्यंत मजल मारली. पुढे काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने १९९५ मध्ये अपक्ष उभे राहून सायकल निशाणीवर माकपचा पराभव करून ते प्रथमच आमदार झाले. चव्हाण हे अपक्ष आमदार झाले, त्यावेळी चांगले काम केल्यानंतर त्यांनी काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे मन रमले नाही. लढवय्या नेता असल्याने तसेच आदिवासी भागातील समस्यांची जाण त्यांना असल्याने ते कोणतीही समस्या घेऊन संघर्ष करणारे आक्रमक आदिवासी नेते म्हणून त्यांची ख्याती झाली. पुढे माजी आरोग्य मंत्री (स्वर्गीय) डॉ. डी. एस. आहेर यांच्या मदतीने भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला. भाजपनेदेखील या लढवय्या नेत्याला मुस्लिम बहुसंख्य असलेल्या मालेगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. आणि या लोकसभा मतदारसंघात भाजपचे कमळ पहिल्यांदाच फुलविण्याचे शिवधनुष्य चव्हाण यांनी पेलून दाखवले. नंतरच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ते दोन वेळा खासदार म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आले.
भाजपची विचारसरणी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जबरदस्त प्रभाव त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरच आहे. त्यांच्या सौभाग्यवती कलावती चव्हाण यादेखील भाजपच्या उमेदवारीवर जिल्हा परिषदेत पोहोचल्या होत्या. तर मुलगा समीर याने भाजप युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रतापगड या गावाला भेट दिली आहे. सन २००८ मध्ये त्यांनी वयाच्या ५८व्या वर्षी नाशिकहून निफाडला जात असताना त्यांचा अपघात झाला. त्यात त्यांच्या मणक्याला मार बसला आणि मांडीचे हाड मोडले. एक वर्ष बिछान्यावरून त्यांना हलतादेखील येत नव्हते. त्याच काळात त्यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया झाल्या. पक्षावरील निष्ठा इतकी जबर की, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना संसदेमध्ये जुलैमध्ये विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्यासाठी भाजपचे खासदार म्हणून स्ट्रेचरवरून एअर ॲम्ब्युलन्सने ते दिल्लीत गेले होते. इतक्या गंभीर अवस्थेत मतदानाला आल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान (स्वर्गीय) अटल बिहारी वाजपेयी यांनीदेखील चव्हाण यांच्या पक्षनिष्ठेबद्दल गौरवोदर काढून ‘हरिश्चंद्रजी आपने तो बहुत अच्छा काम किया है, पार्टी जरूर इसको याद रखेगी’, अशी भावना संसदेमध्ये व्यक्त केली होती.
सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारले होते. नाशिक जिल्ह्यातील आशिया खंडामध्ये कांद्यासाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ म्हणून लासलगावकडे पाहिले जाते. संसदेमध्ये अनेक वेळा त्यांनी कांदा प्रश्न उठवला. आदिवासींमध्ये धनगरांचा समावेश करू नये, म्हणून त्यांनी संसदेमध्ये नेहमीच आवाज उठवला. संसदेला ठणकावून सांगितले, जर धनगर जातीचा समावेश आदिवासी जमातीमध्ये केला, तर आमचे आदिवासी बांधव हे नक्षलवादी बनतील. प्रत्येक पक्षाशी मैत्रीचे संबंध त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रस्थापित केले होते.
आदिवासींचा संघर्ष चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. आदिवासी जमातीमध्ये धनगर जातीचा समावेश करू नये ही मागणी त्यांनी ठामपणे संसदेत परखडपणे मांडून याला कडाडून विरोध केला. कांदा उत्पादक शेतकरी यांना भाव मिळावा म्हणून दिल्लीदरबारी पाठपुरावा केला. प्रशासनामध्ये काम करताना त्यांची प्रशासनावर उत्तम प्रकारे पकड होती. आदिवासींचे कोणतेही सामाजिक प्रश्न असो, कोणतीही समस्या असो, अगदी तळागाळातील कार्यकर्ते सर्वसामान्य समस्या त्यांच्याकडे घेऊन जात होते. ती समस्या चुटकीसरशी सोडवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. आदिवासी भागातील लोकप्रतिनिधींबरोबर जाणीवपूर्वक विकासासाठी झटताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. देशात आदिवासींचे ५२ खासदार आहेत. त्यात महाराष्ट्रात चार आदिवासी लोकसभा मतदारसंघ आहेत. बोगस आदिवासींना विरोध करणारा एकमेव खासदार हरिश्चंद्र चव्हाण होते. कुणावरही अन्याय न करता, जातीभेद न करता कामाच्या ठिकाणी काम आणि इतर वेळी मतदारसंघातील कामाचा आढावा घेत आणि दांडगा अनुभव असणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व रस्ते, वीज, आरोग्य, पाणी, शिक्षण, दळणवळण, आदिवासी वसतिगृह या बाबींवर हरिश्चंद्र चव्हाण यांनी बरीच कामे केली आहेत. हरिश्चंद्र चव्हाण यांचा जन्म २५ डिसेंबर १९५२ला प्रतागड येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.एस्सी (इंग्रजी) झाले.
राजकीय कारकीर्द
१९६८ : सरपंच प्रतापगड ग्रामपंचायत (राष्ट्रीय काँग्रेस)
१९७२ : नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष
१९९५ : सुरगाणा- पेठ मतदारसंघातून अपक्ष आमदार निवडून आले ( निशाणी सायकल)
२००४ : मालेगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपमधून पहिल्यांदा खासदार
२००९ : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून दुसऱ्यांदा खासदार
२०१४ : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे खासदारकीची हॅट्ट्रिक
२०१९ : भाजपने खासदारकीचे तिकीट नाकारले
शैक्षणिक कार्य
सन २००० मध्ये सुरगाणा तालुक्यात दोन शाळा सुरू केल्या आहेत.
जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, ठाणगाव.
माध्यमिक विद्यालय, मनखेड.
-रतन चौधरी