भगवान त्र्यंबकराजाच्या जयघोषात रथोत्सव
नयनरम्य सोहळा; हजारो भाविकांची गर्दी
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-16 12:27:33
लोकनामा प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर : रांगोळ्यांची सजावट, फुलांचे गालिचे, बॅण्डचा निनाद, फुलांची उधळण, वाजंत्रीचे सूर, पांचजंन्याचा धीरगंभीर स्वर आणि भगवान त्र्यंबकराजाच्या जयघोषात त्र्यंबकेश्वरचा रथोत्सव सोहळा उत्साहात आणि दिमाखात झाला. हा नयनरम्य सोहळा बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
भगवान त्र्यंबकराजाचा रथ सोहळा हे त्र्यंबकनगरीचे वैभव आहे. सर्वत्र दीपोत्सवाची सांगता झाली असली, तरी त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत त्र्यंबकेश्वरचा दीपोत्सव सुरू असतो. दिवाळीपासून ग्रामवासीय रथोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात.
गुरुवारी (दि. १४) रात्री ११ ते उत्तररात्री १.३० पर्यंत वैकुंठ चतुर्दशीची विशेष महापूजा, पालखी सोहळा व हरिहर भेट सोहळा झाला. गुरुवारी चतुर्दशीच्या दिवशी सरदार विंचूरकर व देवस्थानतर्फे दुपारी १ ते १.३० पर्यंत महापूजा झाली. मंदिरासमोर ध्वजस्तंभपूजन झाले. दुपारी साडेचारला भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा वाजतगाजत मंदिराबाहेर पालखीतून आणून रथात विराजमान करण्यात आला.
पेशव्यांचे सरदार रघुनाथ विंचूरकर यांनी ३ नोव्हेंबर १८६५ ला हा रथ देवस्थानास दिला होता. संपूर्ण शिसवी लाकडात बांधलेल्या या रथासाठी त्याकाळी १२ हजार रुपये खर्च आला होता. जयपूर येथील माणिकचंद रजपूत यांनी हा रथ तयार केला होता. पेशव्यांचे सरदार विंचूरकर यांच्यातर्फे त्यांचे उपाध्ये रवींद्र अग्निहोत्री यांच्या हस्ते भगवान त्र्यंबकेश्वराची, रथाची पूजा व आरती करण्यात आली.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले, प्रदीप तुंगार, मनोज थेटे, रूपाली भुतडा, स्वप्नील शेलार, प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, अमित टोकेकर, रश्वी जाधव, अमित माचवे, विजय गंगापुत्र आदी उपस्थित होते. रथाला चार बैलजोड्या जोडण्यात आल्या होत्या. रथ मंदिरासमोरून हलला. सर्वांत पुढे धर्म ध्वजाधारक, त्यामागे बॅण्डपथक, त्यामागे चांदीचा मुखवटा ठेवलेली पालखी, त्यामागे वाजंत्री, त्यामागे पानाफुलांनी व आकर्षक विद्युत रोषणाई केलेला रथ, त्यामागे ग्रामस्थ, भाविक अशी भव्य शोभायात्रा मेन रोडमार्गे सायंकाळी साडेपाचला कुशावर्त चौकात पोहोचली. कुशावर्त तीर्थावर वेदमूर्ती रवींद्र अग्निहोत्री यांनी भगवान त्र्यंबकेश्वराची अभिषेक पूजा केली. शागीर्द म्हणून राधेय कुलकर्णी व सचिन दिघे यांनी सेवा बजावली. पूजा झाल्यानंतर पुन्हा मुखवटा रथात विराजमान करून परतीचा प्रवास सुरू झाला. संपूर्ण रथमार्गावर भव्य व आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. मृत्युंजय त्र्यंबकेश्वरचा राजा मित्रमंडळाने रांगोळीचा देखावा सादर केला. मेन रोड परिसरातील घरमालक, दुकानदारांनी रांगोळी उपलब्ध करून दिली. रांगोळी कलाकार राजाधिराज त्र्यंबकराज मनीष महाजन ग्रुप व त्याचे १८ कलाकारांनी भव्य रांगोळी सादर केली.
स्वयंसेवी संस्थांतर्फे फुलांचे गालिचे तयार केले होते. यावरून रथ मार्गस्थ झाला. सायंकाळी आकर्षक रोषणाईमुळे रथाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. रथासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. रथ मंदिरासमोर आल्यानंतर भगवान त्र्यंबकेश्वराचा मुखवटा पालखीतून मंदिरात नेण्यात आला. मंदिराच्या प्रांगणातील दीपमाळांची विधिवत पूजा करून माळ प्रज्वलित करण्यात आली. पूजेचे पौरोहित्य श्रीमंत पेशव्यांचे वंशपरंपरागत तीर्थोपाध्ये वेदमूर्ती दिलीप रुईकर व ओंकार रुईकर यांनी केले.
यावेळी त्रिपुरवाती जाळण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. आकर्षक रोषणाई व त्रिपुरवातींच्या उजेडात मंदिर अधिकच सुंदर दिसत होते. भाविकांच्या गर्दीने मंदिर तुडुंब भरले होते. रथोत्सवाची सांगता देवस्थानतर्फे पेढे वाटप करून केली. पोलीस उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे व सहकार्यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.