ग्रामदेवता श्रीमहादेवीला बैलगाडीभर भाताचा बळी

तीनशे वर्षांची परंपरा; शेकडो ग्रामस्थांच्या लवाजम्यासह मिरवणूक

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-16 12:36:01

लोकनामा प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर :  सर्वत्र सुख-शांती नांदावी, आरोग्य चांगले राहावे, रोगराईची साथ गावात येऊ नये, यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ग्रामवासीयांतर्फे त्र्यंबकेश्वरची  ग्रामदेवता  श्रीमहादेवीला  बैलगाडीभर भाताचा  बळी  अर्पण केला. गेल्या तीनशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.  यानिमित्त पुरोहित संघातर्फे श्रीगंगा गोदावरी मंदिरात  विश्वकल्याणार्थ चंडीयाग करण्यात आला. 
         नागरिकांनी इच्छेनुसार आपापल्या घरातून तांदूळ आणून कुशावर्तावर जमा केले. कुशावर्ताच्या पवित्र पाण्यात तांदूळ भिजवून त्याचा भात  तयार करण्यात आला. शिजवलेला  भात  एका बैलगाडीत भरण्यात आला.  भाताच्या मधोमध टेंभा लावण्यात आला. वेदमंत्राच्या जयघोषात बलीची यथासांग पूजा करण्यात आली. या पूजेचा मान परंपरेने पेंडोळे, देशमुख, मुळे,  महाजन व खांडेकर या घराण्यांकडे आहे. पूजेचे पौरोहित्य ग्रामपुरोहित वेदमूर्ती सौरभ दीक्षित यांनी केले. 
         बलीची पूजा सुरू झाल्यावर  भातात रोवलेला टेंभा प्रज्वलित केला. सजवलेले बैल  गाडीला जुंपण्यात आले. मशाल सांभाळण्याचा मान गंगापुत्र घराण्याकडे आहे. त्यांच्या वतीने प्रणव राम गंगापुत्र यांनी मशाल सांभाळली.  पुढे बॅण्डपथक त्यामागे  भात बलीची गाडी. त्यामागे वेदमंत्राचे पठण करणारे शेकडो ब्रह्मवृंद व त्यामागे ग्रामस्थ, अशा सर्व लवाजम्यासह  बळीची मिरवणूक दुपारी बाराला कुशावर्त  तीर्थापासून निघाली. भगवती चौक, बोहरपट्टी, श्रीलक्ष्मीनारायण चौक,  त्र्यंबकेश्वर मंदिर, डॉ. बाबासाहेब  आंबेडकर चौक, नगरपरिषद कार्यालयासमोरून पोलीस ठाण्यासमोरील श्रीमहादेवी मंदिरासमोर मिरवणूक नेण्यात आली. तेथे  महादेवीला पंचामृत अभिषेक पूजा करून हा बली देवीला अर्पण केला, तर मशाल देवी मंदिराबाहेर ठेवण्यात आली. 
      यावेळी नागरिकांनी परंपरेनुसार देवीला नारळ फोडून प्रसाद व मशालीचा अंगारा घरी नेला. परंपरेनुसार प्रदीप तथा दादू गाजरे यांची बैलगाडी, तर सुधीर शिखरे यांची बैलजोडी होती. यावेळी पुरोहित संघ, श्रीमहादेवी संस्थान विश्वस्त मंडळ, श्रीमहादेवीचे पुजारी गाजरे बंधू, राम गंगापुत्र, राजेंद्र गंगापुत्र,  विकी गंगापुत्र, गंगापुत्र ट्रस्ट मंडळी, सचिन शिखरे, भूषण भोई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.