राठोडांना डावलून गोसावींची आयुक्तपदी नियुक्ती
तत्कालीन कृषिमंत्र्यांमुळे भुजबळांच्या शिफारशीला आडकाठी
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-16 12:43:35
प्रवीण साळुंके : लोकनामा
मालेगाव : येथील महापालिका आयुक्तपदी आशुतोष राठोड यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस मंत्री छगन भुजबळ यांनी सन २०२१ मध्ये तत्कालीन नगरविकासमंत्र्यांकडे केली होती. यावर तत्कालीन कृषिमंत्र्यांनी भालचंद्र गोसावी यांची आयुक्तपदी नियुक्ती करावी, अशी मागणी केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त त्र्यंबक कासार यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर तत्कालीन महापौर ताहेरा शेख रशीद यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मनपा आयुक्तपदी अधिकारी नेमावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्यावर भुजबळ यांनी ३० मार्च २०२१ रोजी तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तेव्हाचे मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव श्रेणीतील वर्ग-१ चे वरिष्ठ अधिकारी आशुतोष राठोड यांच्या नियुक्तीची शिफारस पत्राद्वारे केली होती.
राठोड यांच्याकडे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात उपसंचालक, विशेष कार्यकारी अधिकारी कौशल्य विकास या पदांवर प्रशासकीय कामकाज केल्याचा प्रदीर्घ अनुभव होता. या शिफारस पत्रानंतर तत्कालीन कृषी तथा माजी सैनिकमंत्र्यांनी ६ एप्रिल २०२१ रोजी तत्कालीन नगरविकासमंत्री शिंदे यांच्याकडे नाशिकचे वर्ग- १ चे जिल्हा प्रशासन अधिकारी भालचंद्र गोसावी यांची मनपा आयुक्तपदी बदली करावी, अशी मागणी केली होती. त्यावरून गोसावींची २१ मे २०२१ रोजी मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
गोसावी यांनी येथील मनपा आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर दोन महिन्यांनंतर राज्य शासनाच्या प्रशासन विभागाने ३० जुलै २०२१ पत्राद्वारे गोंदिया येथील तत्कालीन जिल्हा प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष भारतीय प्रशासकीय सेवेतील संजय दैने यांची पदोन्नतीने आयुक्तपदी नियुक्ती केली होती. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच ३ ऑगस्ट २०२१ रोजी तत्कालीन कृषिमंत्र्यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आयुक्त गोसावी यांची बदली स्थगित करण्याची विनंती केली.
या पत्रात गोसावी यांना मनपा आयुक्तपदी नेमणूक करून दोन महिने दहा दिवस झाले असून, त्यांच्याबाबत कोणतीही तक्रार नाही. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसल्याने त्यांच्या बदली आदेशाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानंतर सनदी अधिकारी दैने यांची हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. या स्थगिती आदेशामुळेच गोसावी मनपा आयुक्तपदी कायम झाले.
गोसावींवर लाचलुचपत विभागाचा गुन्हा
येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तुषार पाटील यांना ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखा तथा सायबरचे सेलचे जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद वाढणकर यांनी माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, मनपाचे तत्कालीन आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्यावर बदलापूर (पूर्व) येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल आहे. त्यांना २५ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी एकला ताब्यात घेण्यात येऊन न्यायालयाने दोन दिवसांची म्हणजे २७ सप्टेंबर २०१८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १२ ऑक्टोबर २०१८ पावेतो न्यायालयीन कोठडी देऊन जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.