मंदिरांपुढे उजळणाऱ्या सुंदर दीपमाळा!
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-16 14:56:34
दिवाळीनंतर बहुविध हिंदू सणांचा कालखंड सुरू होतो. प्रत्येक ठिकाणी ते साजरे करण्याचा दिमाख वेगळा, उत्साह वेगळा! अगदी देवदिवाळीसुद्धा याच काळात येते. कार्तिकी एकादशीनंतर तुळशीचे लग्न लावणे, विविध पालख्यांमधून देवाची मिरवणूक काढणे, तेलाच्या दिव्यांनी दीपमाळा उजळणे, दिव्यांनी सजावट करणे, नद्या- सरोवरे यांतील पाण्यात दिवे सोडणे इत्यादी गोष्टी बहुतेक सर्व गावांमधून साजऱ्या केल्या जातात. या महिन्यात सूर्य थोडा उशिरा उगवतो व लवकर मावळतो. त्यामुळे काळोख अधिक काळ असतो. थंडी स्थिरावलेली असते. थंडीत पांघरूण घेऊन झोपण्यापेक्षा पहाटे कार्तिकस्नान, काकड आरती, नक्षत्र दीप उजळणे असे उपक्रम केले जातात. त्रिपुरी (त्रिपुरारी) पौर्णिमेला गावागावांतून मंदिरांमध्ये उजळल्या जाणाऱ्या दीपमाळा तर डोळ्यांचे पारणे फेडतात.
महाराष्ट्रात सर्वत्र दीपमाळांचे अनेक प्रकार आढळतात. पायापाशी मोठा आणि वर कमी होत गेलेला आकार असलेल्या स्तंभावरील अत्यंत कोरीव अशा विविध शाखांवर (स्टँड) दिवे ठेवले जाण्याचा प्रकार अधिक लोकप्रिय आहे. दुसऱ्या प्रकारात सबंध दीपमाळेच्या मधल्या मोठ्या खांबाला दिवे ठेवण्यासाठी अनेक कोनाडे केलेले असतात. या कोनाड्यात दिवे ठेवल्यामुळे ते वाऱ्याने विझण्याची शक्यता खूप कमी होते. या स्तंभाला देवळी असे म्हटले जाते. असा देवळीचा खांब आणि त्यालाच दिवे ठेवण्यासाठी शाखा (स्टँड) अशा दोन्हीही एकत्रित व्यवस्था असलेल्या दीपमाळा सर्वत्र आढळतात. तर काही ठिकाणी दिवे ठेवण्यासाठी केवळ कोनाडे केलेले असतात. या कोनाड्यांनासुद्धा देवळी म्हटले जाते. कोकणापासून ते थेट गोवा, केरळपर्यंत बहुतेक सर्व ठिकाणच्या मोठ्या देवळांमध्ये अत्यंत सुंदर दीपमाळा पाहायला मिळतात. महाराष्ट्रात कोकणामध्ये जांभ्या दगडाच्या, घाटमाथ्यावर काळ्या पाषाणातल्या, गोव्यामध्ये एकाहून एक सुंदर मनोऱ्यांप्रमाणे बांधलेल्या आणि रंगविलेल्या किंवा धातूच्या प्रचंड दीपमाळा पाहायला मिळतात. यात सर्वांत वर कमळाच्या आकाराचा, आकाशाकडे मुख असलेला एक मोठा दिवा पाहायला मिळतो. मराठा सरदारांनी जिंकलेल्या अन्य राज्यांमधील काही देवळांमध्येही दीपमाळा बांधलेल्या दिसतात. केरळमध्ये तर काही चर्चेसच्या समोर हिंदूंच्या दीपमाळांशी साधर्म्य असणारे मोठे मनोरे बांधलेले दिसतात.
कोकणातील अनेक मंदिरांमध्ये, जांभ्या दगडाच्या पाच ते सात-आठइतक्या दीपमाळा बांधलेल्या दिसतात, तर काही ठिकाणी अशा जांभ्या दगडांच्या आणि काळ्या पाषाणात कोरलेल्या दीपमाळा एकत्रच आढळतात. कोल्हापूर, जेजुरी अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणीसुद्धा एकाहून अधिक संख्येने दीपमाळा उभारलेल्या दिसतात. अनेक दीपमाळा नवस फेडण्यासाठीही बांधल्या जातात. महाराष्ट्रात अन्य अनेक ठिकाणी मुंबईतील कापड गिरण्यांच्या धुरांड्यांप्रमाणे, चिमण्यांप्रमाणे सरळसोट, पण निमुळते खांब आणि त्याला अत्यंत साध्या अशा दिवे ठेवण्याच्या जागा असलेल्या दीपमाळा पाहायला मिळतात. पुण्याच्या राजगुरुनगरजवळ चासकमान येथील सोमेश्वर मंदिरातील २५६ दिव्यांची दीपमाळ ही अत्यंत देखणी आहे. ही संपूर्ण दीपमाळ चारही बाजूंच्या भिंतीतील कोनाडे आणि गावातील नदीकाठावरील शेकडो कोनाडे दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेला दिव्यांनी उजळलेले पाहायला प्रत्यक्ष सोमेश्वर नक्कीच अवतरत असेल. गोव्यातील म्हार्दोळ येथील म्हाळसा नारायणीच्या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे. येथे सुमारे तीन मजली उंच आणि संपूर्ण पितळेची अत्यंत सुंदर दीपमाळ आहे. त्रिपुरी पौर्णिमेला ती संपूर्ण दीपमाळ उजळली जाते. दीपमाळेतील प्रत्येक पाळीतील प्रत्येक दिव्यात वात घालून तेल घातले जाते. प्रचंड शिड्यांच्या आधारे वर चढून प्रत्येक दिवा उजळला जातो. याशिवाय देवळाच्या प्रांगणामध्ये हजारो दिवे उजळले जातात. आजूबाजूला विद्युत दिव्यांचा आक्रस्ताळा झगमगाट नसल्यामुळे हे सर्व दृश्य अक्षरश: डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. लातूरच्या रेणापूर येथील रेणुकामाता मंदिराची दीपमाळ हलवली तर हलताना पाहायला मिळते. अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन गावामध्ये असलेल्या भवानी मंदिरातील दीपमाळासुद्धा अशाच हलतात. दीपमाळांच्या जगतातील हे एक वैशिष्ट्यच म्हणायचे. विष्णू प्रबोधोत्सवाच्या निमित्ताने देवाला जागविण्यापेक्षा आपण जागरूक होणे महत्त्वाचे आहे.
-मकरंद करंदीकर