आत्मसाक्षात्कार म्हणजे काय?

Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-16 15:19:36

सणवार घटकाभर मनोरंजनासाठी असावेत. दुसऱ्याला त्रास होईल, असे नसावे. त्यांची निर्मिती तेवढ्यासाठीच झाली होती, तेवढ्यासाठीच ठेवावी. परंपरा आहे म्हणून करण्यात अर्थ नाही. आपण कितीतरी परंपरा बदलल्या. का? कारण त्या कालबाह्य झाल्या होत्या. रूढी, परंपरा या कालांतराने बदलत जायलाच हव्या. त्या करायच्याच असतील तर त्या मागचा मूळ हेतू समजून त्या करायला हव्यात. या बदललेल्या जमान्यात त्या करायलाच हव्यात का, हा प्रश्नसुद्धा विचारून पाहा. हे जेव्हा लक्षात येईल, तेव्हाच मानव खऱ्या अर्थाने विकसित किंवा सुशिक्षित झालेला असेल.

    समाजाला संस्कारांच्या चौकटीत राहाण्यासाठी देवांची स्थापना झाली असावी आणि चौकटीच्या बाहेर पडू न देण्यासाठी दानवांची निर्मिती झाली असावी. दोन्हींचे अस्तित्व मानवनिर्मित! सगळ्यात ‘चांगले’ शोधावे हे देव शोधण्यासमच आहे. आता मूल (मनुष्य) मोठे झाले आहे, तर त्याला बागुलबुवा किती दिवस दाखवायचा? आता मूल सज्ञान झाले आहे, मुलाला प्रतीके दाखवायची गरज राहिली नाही, तर चांगले काय वाईट काय हे नीट कळू लागले आहे, मग ही प्रतीकात्मक पूजा किती दिवस? कारण आता ते टोकाला जाऊ लागले आहे. या चांगल्या- वाईटपणाच्या बागुलबुवामुळे ते मूल पांगळे झाले आहे. त्या बागुलबुवाचाच आधार घेऊन ते एकमेकांना घाबरवू लागले आहे. त्याच्या आधारे ते धडधाकट होऊनही त्या आधाराच्या काठीचा आता ते शस्त्र म्हणून उपयोग करू लागले आहे. ते कमी नको का करायला? त्या ‘देव- दानव’ नामक शस्त्राचा आधार काढून नको का घ्यायला? कुठल्याही चांगल्या गोष्टींची निर्मिती आपल्या चांगल्यासाठीच होते, पण पुढे ती गोष्ट कालबाह्य होते तेव्हा ती बदलावी लागते ना? पूर्वी बैलगाडीने गावोगाव प्रवास होत असे. अजूनही तो करतो का आपण? आता वेळेचे महत्त्व लक्षात आल्यापासून आपल्याला जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनांची गरज भासू लागली आहे. बैलगाडी कालबाह्य झाली आहे. 
       लहान मुलांना आपण काही भीती घातलेल्या असतात, त्या मोठेपणी समजू लागल्यावर आपण घालत राहातो का? ज्या चांगल्या गोष्टींची सवय लावलेली असते (लहानांची काळजी घे, मोठ्यांना नमस्कार कर) या मोठे झाल्यावर सांगत राहातो का? हात धरून करायला लावतो का? तेव्हा तसेच, आपणच मंदिरे शोधत, हात जोडत, त्याचा साक्षात्कार घेत, चमत्कार शोधत फिरणे कुठवर योग्य? दानव-भूत-पिशाच्च यांची भीती दाखवली जायची, पण दिव्यांच्या झगमगाटात, रोषणाईत त्यांची जशी भीती आता नाहीशी होत चालली आहे, तशी देवांची गरज नको का कमी व्हायला? प्रतीकात्मक पूजेतून बाहेर नको का पडायला? जगात असे कित्येक लोक आहेत जे कुठलाही देव अथवा धर्म पाळत नाहीत. ज्यांचा स्वर्ग- पाताळावर विश्वास नाही. ते जगतातच आहेत ना? ते काही सगळे ॲक्सिडेंटने मरत नाहीत की, देव देव करणाऱ्यांना न्यायला देव विमान पाठवत नाही. देव- दानवांची गरज अशिक्षित जनतेला होती, पण आता ती तशी राहिली नाही. त्यांना समाजाच्या, संस्कारांच्या बंधनात अडकवून ठेवण्यात देवांची गरज होती. परंतु आता आपण इतके सशक्त नाही का? त्याच्या पलीकडे विचार करण्याची शक्ती नाही का? माझा पहिल्यापासून एकच प्रश्न आहे, देव- दानव, भूत-प्रेत, पिशाच्च या पलीकडे जाण्याइतपत आपली बुद्धी सज्ज नाही का? माझ्या मते झाली आहे. स्वीकार करावा आणि मार्गस्थ व्हावे. आता देव-दानव, कर्म-कांड, व्रत-वैकल्य यांत अडकू नये. इतकेच काय, यालाच अनुसरून आता रूढ असलेल्या ‘धर्म’ नावाच्या भोवऱ्यात अडकू नये. हजारो वर्षांपूर्वी तो नव्हता, तसाच आताही तो कमी करावा. शेवटी आत्मसाक्षात्कार म्हणजे काय नक्की? मी, मला काय समजले आजवरच्या आयुष्यात हे वर सविस्तर सांगितले आहेच. मनुष्य, त्याचा झालेला मानव, त्याने निर्मिलेले देव-दानव, सध्या प्रचलित असलेल्या अर्थाचा धर्म आणि या सापेक्ष मी, माझे अस्तित्व. या सगळ्याची अनुभूती म्हणजे आत्मसाक्षात्कार. देवत्व कशात आहे हे शोधायची गरज नाही. शोध लागला आहे, माणसाने माणसासारखे वागत, आपला धर्म पाळत, इतर लोकांना सांभाळत, इतर प्राणिमात्रांवर प्रेम करत, स्वतःवर अवलंबित लोकांना सांभाळत मिळेल तेवढे जीवन आनंदात जगणे म्हणजे जीवनधर्म.  आणि हे कळणे म्हणजे आत्मसाक्षात्कार! (समाप्‍त)

-निखिल राजे ( ९०२८४९९९२१ )