दोन थोरांचा प्रेमादर
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-16 15:40:15
अमृतानुभवाच्या प्रसंगापासून केशवराव महाराज व दासगणू महाराज या दोघांचा जिव्हाळ्याचा असा ऋणानुबंध जडला. श्री केशवराव वारकरी संप्रदायाचे कट्टर अभिमानी. 'एकविधा भाव भक्ताचा स्वधर्म' ही त्यांची निष्ठा; परंतु रामदासी पंथाच्या श्री दासगणूंविषयी त्यांना विशेष आदर वाटत असे. दासगणूंकडून काही पत्र, चिठ्ठी आली की, नमस्कारासाठी पत्र आधी मस्तकी लावून मग वाचत. उलट दासगणूंच्या मनात केशवराव महाराजांविषयी तितकाच आदरभाव होता. आपल्या अनेक अध्यात्मविषयक अडचणी त्यांनी देशमुखांना समक्ष वा पत्ररूपाने कळवाव्यात व त्यांचा सल्ला मागावा. दोन थोर माणसे एकमेकांशी किती प्रेमादराने वागतात, हे या दोघांच्या वर्तनावरून पाहावयास मिळेल.
गुरुपदेशाच्या वेळी दासगणू महाराजांच्या गळ्यात त्यांनी घातलेली जी माळ होती, ती पुढे फार दिवस टिकली नाही. वामनशास्त्री कैलासवासी झाल्यावर मग माळेचा विशेष प्रश्नही उरला नाही. पुढे दासगणू महाराज कीर्तन करू लागल्यावर एकदा सहज धामणगावास गेले होते. माणकोजी बोधले या नावाचे एक थोर सत्पुरुष या गावी होऊन गेले. त्यांचे चरित्र मोठे रमणीय आहे. त्यावर एक अत्यंत रसाळ असे आख्यान रचून बोधलेबोवांच्या समाधीपुढे दासगणूंनी कीर्तन केले. सर्व लोक त्या आख्यानातील अभिनवता, निर्दोष मांडणी आणि भक्तिप्रेम पाहून संतुष्ट झाले. बोधलेबोवांच्या गादीवर असलेल्या गृहस्थांनी कीर्तनानंतर दासगणू महाराजांविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी काही वस्त्रे व बिदागी आणली. दासगणू महाराजांनी ती भेट नाकारली. हा बोधलेबोवांचा प्रसाद समजा. बिदागी नव्हे, असे या गृहस्थांनी सांगितले. त्यावर प्रसाद म्हणून देणार असाल, तर हे नको. श्री बोधलेबोवांच्या समाधीवर जी टपोऱ्या मण्यांची तुळशीची माळ आहे, ती तेवढी मला द्या. हा खरा प्रसाद आहे. माझे रामदासीपण आज वारकरीपणाशी मिळून जाऊ दे, असे दासगणू महाराजांनी सांगितले. महाराजांना ती माळ देण्यात आली. तीच त्यांच्या गळ्यात पुष्कळ दिवस होती. ती झिजल्याने तुळशीची तशीच एक नवीन माळ बनवली. ती कोणा तरी पवित्र माणसाच्या हाताने धारण करावी, या भावनेने केशवराव महाराजांच्या हातात देऊन स्वतःच्या गळ्यात घालण्यास विनवले. केशवराव महाराज या गोष्टीला तयार होईनात. 'आपल्याला माळ घालण्याचा मला काय अधिकार महाराज?' असे ते नम्रपणाने म्हणाले, पण श्री दासगणू महाराजांच्या आग्रहापुढे त्यांचे चालले नाही. केशवरावांनी ती माळ श्री दासगणू महाराजांच्या गळ्यात घातली. दोघांनी परस्परांस कडकडून मिठी मारली. श्री दासगणूंचे हृदय तर भावभक्तीचा सागरच. त्यांचे डोळे अशा प्रसंगाने तेव्हाच ओघळू लागत; परंतु श्री केशवरावांच्याही डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. मी लहान होतो, पण पंढरपुरातील खाजगीवाल्यांच्या वाड्याच्या दक्षिणेच्या अंगणातील तुलसीवृंदावनाजवळील तो प्रसंग माझ्या डोळ्यापुढे आजही जसाच्या तसा उभा आहे.
- स्वामी वरदानंद भारती
शब्दांकन - सतीश निरंतर