आयसीसीचा पाकिस्तानला दणका
चॅम्पियन्स ट्रॉफी वादग्रस्त ठिकाणी नेण्यास मनाई
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-11-16 15:58:08
नवी दिल्ली : भारतीय संघ सुरक्षेच्या कारणास्तव चॅम्पियन्स ट्रॉफी-२०२५ स्पर्धेसाठी यजमान असलेल्या पाकिस्तानात खेळणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्टपणे कळविल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेक विनवण्या केल्या होत्या. मात्र, या स्पर्धेसंदर्भात आयसीसीने पाकिस्तानला वेगळाच धक्का दिला आहे. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौरा आयोजित केला होता. त्यात पाकव्याप्त काश्मीरमधील तीन ठिकाणांचाही समावेश होता. या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करत चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी जाणार नाही, असे निर्देश आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले होते की, करंडक स्कर्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद याठिकाणी जाईल. १६ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत करंडक पाकिस्तानमध्ये नेला जाईल अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर दिली होती. मात्र, पाक बोर्डाने नमूद केलेल्या या चार ठिकाणांपैकी फक्त मारी हे ठिकाण पाकिस्तानचा भाग आहे. याशिवाय इतर तीन ठिकाणे स्कर्दू, हुंजा व मुझफ्फराबाद पाकव्याप्त काश्मीरमध्ये येते.
पाकिस्तानने याची घोषणा करताच बीसीसीआयने आक्षेप घेतला. आयसीसीने यावर तत्काळ कारवाई करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला करंडक कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी नेण्यास मनाई केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या कृतीमुळे भारतीय संघाचे चाहते संतप्त झाले आहेत, पण बीसीसीआयने आयसीसीला वेळीच याची माहिती दिली आणि पाकिस्तानला तसे करण्यापासून रोखले. आता आयसीसीच्या कारवाईनंतर पाकिस्तान मैदान बदलू शकते. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच वादग्रस्त ठरत आहे.