मणिपूर पुन्हा पेटले

मुख्यमंत्री, दहा आमदारांच्या घरांवर हल्ला

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-18 11:48:04

इम्फाळ : राज्यात तीन महिला व तीन मुलांचे मृतदेह सापडल्यानंतर हिंसक निदर्शने सुरू आहेत. मणिपूरमध्ये परिस्थिती चिघळली असून, शनिवारी (दि. १६) मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह व दहा आमदारांच्या घरांवर हल्ला करण्यात आला. बिघडलेली परिस्थिती पाहून पाच जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सात जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपुरातील चार सभा रद्द करून दिल्लीला परतले आहेत. 

राज्यातील सुरक्षाव्यवस्थेबाबत ते बैठक घेतील. त्याचवेळी केंद्रीय राखीव पोलीस दलप्रमुख अनिश दयाल यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठविण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारने केंद्राला सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा मागे घेण्यास सांगितले आहे. 
         हिंसाचारामुळे केंद्र सरकारने १४ नोव्हेंबर रोजी इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, जिरिबाम, कांगपोकपी व बिष्णुपूर जिल्ह्यांतील सेकमाई, लामसांग, लमलाई, जिरिबाम, लिमाखोंग आणि मोइरांग पोलीस ठाणे परिसरात सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा  लागू केला होता. दरम्यान, काही मंत्र्यांसह भाजपच्या १९ आमदारांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून बिरेन सिंह यांना हटविण्याची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन-तीन दिवसांत परिस्थिती आणखी बिघडल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. जिरिबाम येथील बराक नदीपात्रातून शनिवारी (दि. १६) दोन महिला व एका मुलाचा मृतदेह सापडला होता. ११ नोव्हेंबर रोजी जिरिबाम येथून कुकी अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण केल्याचा संशय आहे. ११ नोव्हेंबरलाच सुरक्षा दलांनी दहा बंदूकधारी अतिरेक्यांना ठार केले होते. कुकी-जो संघटनेने या दहा जणांची ग्रामरक्षक म्हणून वर्णी लावली होती. शुक्रवारी (दि. १५) रात्री एक महिला व दोन मुलांचे मृतदेह सापडले होते.
             निदर्शनांमुळे पाच जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळपासून सात जिल्ह्यांत इंटरनेटवर दोन दिवस बंदी घालण्यात आली आहे. हे जिल्हे असे ः इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, बिष्णुपूर, थौबल, कक्चिंग, कांगपोकपी व चुराचंदपूर. ११ नोव्हेंबरला गणवेश परिधान केलेल्या सशस्त्र अतिरेक्यांनी बोरोब्रेका पोलीस ठाणे कॉम्प्लेक्स व सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला होता. यात दहा दहशतवादी मारले गेले. यावेळी जिरिबाम जिल्ह्यातील बोरोब्रेका पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या मदत शिबिरातून सहा जणांचे अपहरण करण्यात आले.