केंद्र सरकार करतेय द्वेषाचे आणि विभाजनाचे राजकारण
मणिपूर हिंसचार; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-18 11:57:30
नवी दिल्ली : मणिपूर मधील हिंसाचारासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. भाजपला मणिपूर जळायला हवे आहे. ते द्वेषाचे आणि विभाजनाचे राजकारण करत असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.
७ नोव्हेंबरपासून राज्यात १७ जणांना जीव गमवावा लागला आहे. इतर अनेक जिल्ह्यांत हिंसाचार उसळत आहे. मणिपूरच्या बाबतीत पंतप्रधान अपयशी ठरलेत. भविष्यात तुम्ही कधी मणिपूरला गेलात तर तेथील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही असेही खर्गे म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांनीही ट्विट करून मणिपूरमधील अलीकडील हिंसक संघर्ष अस्वस्थ करणारा आहे. एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. केंद्र व राज्य सरकारने हिंसाचार संपविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. मी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना मणिपूरला भेट देण्याची व या प्रदेशात शांतता आणि सुधारणेसाठी काम करण्याची मागणी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मिझोराम सरकारने केंद्र व मणिपूर सरकारला हिंसाचार थांबवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. मिझोरामच्या गृहविभागाने मृत व जखमींच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आहे.