चांदवड मतदारसंघात चित्ररथाद्वारे जनजागृती

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-18 14:32:53

लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक यंत्रणेद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालयांतर्गत केंद्रीय संचार ब्युरोतर्फे चित्ररथाद्वारे चांदवडसह बसस्थानक, न्यायालय,  विश्रांतीगृह, सांगवी, हिवरखेडे आदी ठिकाणी मतदार जनजागृती करण्यात आली.
           विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे.  मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप माध्यमातून मतदारांना आवाहन केले आहे. वाहनाद्वारे जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. १५) चांदवडच्या विविध भागांत जनजागृती करण्यात आली. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले. जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’च्या मुख्य समन्वयक आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली चित्ररथाद्वारे मतदार जनजागृती मोहिमेला प्रारंभ झाला.