प्रसिद्ध गायक मुकुंद फणसाळकर यांचे निधन

पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-11-19 17:19:48

पुणे :- प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन झाले आहे. मुकुंद यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. पण अखेरीस १९ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झी मराठी वाहिनीवरील नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून मुकुंद फळसणकर हे घराघरांत पोहचले होते. झी वाहिनीवरील १९९२ मध्ये झालेल्या सारेगम स्पर्धेच्या पहिल्या पर्वात ते सहभागी होऊन उपविजेते ठरले होते. 

नाशिकच्या मित्रांनी दिला मदतीचा हात 

गेल्या काही वर्षांपासून फणसाळकर नैराश्यात होते. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत ते पोहोचले होते. अशा अवस्थेत त्यांना पाहून नाशिकमधील लोकेश शेवडे व रागिणी कामतीकर यांनी या नैराश्यातून फणसाळकर यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. कुर्तकोटी सभागृहात त्यासाठी त्यांनी फणसाळकर यांची विशेष मैफल देखील आयोजित केली होती.

कुलकर्णी व खाडिलकरांची विशेष पोस्ट 

मुकुंद फणसळकर गेला...अतिशय आवडता गायक..एकेक शब्द असा गायचा की कवीला सुद्धा नव्याने अर्थ उलगडावा...आम्ही शाळा कॉलेज मध्ये असताना ज्यांनी गायनाने..बोलण्याने भारावून टाकलं होतं...त्यातलं एक महत्त्वाचं नाव ….खूप खूप वाईट वाटलं..प्रीतरंग , साजणवेळा , नॅास्टॅस्जिया …. सगळ्या मैफिली डोळ्यासमोर आल्या..एका गुणी आणि संवेदनशील माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली, असे प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांनी म्हटले आहे. तर मुकुंद फणसळकर आणि माझी संगीत सेवा एकत्रच सुरू झाली.. आम्ही स्थापन केलेली स्वरांकित नावाची संस्था, जागतिक मराठी परिषदेची स्मरण यात्रा, हिंदी सारेगमप, अनेक अनेक रंगमंचीय कार्यक्रम.. त्याचा नितळ, निर्दोष, तलम आवाज, सुरेल गळा आणि एकूणच संगीत, सिनेमा आणि साहित्य यातलं अफाट ज्ञान व माहिती.. यामुळे तू रसिकांच्या आणि व्यक्तिशः माझ्या..सदैव स्मरणात राहशील मित्रा.. आमच्या स्मरण यात्रेत..!! असे प्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर यांनी श्रद्धांजली पोस्टमध्ये म्हटले आहे.