विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप

बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राडा

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-19 17:37:38

मुंबई:-  विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला. जवळपास  , जवळपास २ ते ३ तास राडा झाल्यानंतर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एका गाडीतून रवाना झाले. भाजपा आणि बहुजन विकास आघाडी  कार्यकर्ते आपापसांत भिडले. या सगळ्या गदारोळानंतर पोलिसांनी हॉटेल सिल केले. याठिकाणी तणाव पसरला होता.  

विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते. ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. थोड्याच वेळात वाद सुरु झाले.   आमदार क्षितीज ठाकूर यांनी तेथे पोहोचून  हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे यांना दाखवली. यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले. तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिक कुमक मागवली. सध्या पोलिसांनी हॉटेल सिल केले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.

दरम्यान ठाकूर व तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणूक आयोगाने ही पत्रकार परिषद रद्द केली. त्यानंतर तावडे व ठाकूर एकाच गाडीत रवाना झाले. आम्ही जेवायला जातो. मी त्यांच्याशी यासंदर्भात बोलतो.. उरलेले पैसे ते मला देतील. आम्ही मित्र आहोत, असे तावडे यांनी सांगितले. 

दरम्यान, या घटनेचे राजकीय पडसाद लगेचच उमटले आहेत. आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.